बटाटा वडा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. विकतचा वडापाव तर आपण खातोच पण हाच वडा घरीही करतो. अगदी सोपा आहे तसेच पटकन होतो. मात्र घरोघरी याची रेसिपी जरा वेगळीच असते. काही जण पिवळी भाजी करतात तर काही पांढरी. (Make best Batata vada at home - recipe for evening snacks , must try recipe )काही जण त्यात कच्चा मसाला घालतात तर काही परतलेला. वडा विविध प्रकारे केला जातो. त्यापैकीच एक रेसिपी ही आहे. पाहा कसा करायचा चटपटीत वडा.
साहित्य
बटाटा, हिरवी मिरची, लसूण, आलं, हळद, कडीपत्ता, कांदा, शेंगदाणे, जिरे, मोहरी, तेल, बेसन, पाणी
कृती
१. बटाटे कुकरला शिजवायचे. कुकर उघडला की गार करुन घ्यायचे, त्याची सालं काढून घ्यायची. हाताने कुस्करुन घ्यायचे. व्यवस्थित छान कुस्ककरुन घ्यायचे. त्यात तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची.
२. हिरव्या मिरचीचे तुकडे करुन घ्यायचे. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याचे तुकडे घ्यायचे. सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि त्याची पेस्ट वाटून घ्यायची. कढईमध्ये तेल घ्यायचे. तेल गरम करायचे आणि त्यात मोहरी घालायची. थोडं जिरं घालायचं. परतून घ्यायचं. त्यात कडीपत्ता घालायचा. कडीपत्ता मस्त फुलला की त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालायची. अगदी खमंग परतायची. त्यात शेवटी हळद घालायची.
३. नंतर त्यात थोडे शेंगदाणे घालायचे. परतून घ्यायचे. नंतर कांदा घालायचा गुलाबीसर परतायचा. तयार मिश्रण कुस्करलेल्या बटाट्यावर घालायचे आणि गार होऊ द्यायचे. गार झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालायचे. हाताने सगळं एकजीव करुन घ्यायचं. तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. सगळीकडे मसाला एकसारखा लागेल असे मिक्स करायचे.
४. एका खोलगट भांड्यात बेसन घ्यायचे. त्यात मीठ घालायचे. हळद घालायची. पाणी घालून त्याचे मिश्रण तयार करायचे. अगदी पातळ नको. पण मध्यम पातळ करायचे. जास्त घट्ट ठेवू नका, छान एकजीव करायचे.
५. कढईत तेल घ्यायचे. तेल गरम करायचे. तेल तापेपर्यंत तयार मिश्रणाचे गोळे करुन घ्यायचे. बेसनात बुडवायचे आणि गरम तेलात सोडायचे. अलटी पलटी करुन छान खमंग तळून घ्यायचे.
