छोले बटुरे तसेच छोले पुरी आपण नेहमीच खातो. पण छोल्यांची आणखी एक भाजी आहे जी पारंपरिक आणि फार चविष्ट असते. खास पंजाबी रेसिपी आहे.(Creamy and tasty chickpea recipe, an authentic Punjabi taste , easy recipes ) करायला फारच सोपी आहे. चिकर छोले असे या पदार्थाचे नाव आहे. एकदा नक्कीच करुन पाहा.
साहित्य
काबुली चणे, बटाटा, कोथिंबीर, आले, लसूण, तूप, जिरे, हिरवी मिरची, हिंग, कसुरी मेथी, सुकी लाल मिरची, हळद, मीठ, तमालपत्र, पाणी, दालचिनी, वेलीची, कांदा , धणे पूड, लाल तिखट
कृती
१. बटाटा उकडून घ्यायचा. एखादा मध्यम आकाराचा बटाटा पुरेसा आहे. तो गार करायचा आणि त्याची सालं काढून घ्यायची. नंतर त्याचे जरा जाडसर तुकडे करायचे. लहान नको जाडच ठेवा. रात्रभर भिजवलेले काबुली चणे एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात थोडी हळद घालायची. एक तमालपत्र, थोडी वेलची, दालचिनीचा तुकडा घालायचा. कुकर लावायचा आणि चणे शिजवून घ्यायचे.
२. नंतर त्यातील मसाले काढून एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात थोडे शिजवलेले छोलेही घालायचे. शिजवण्यासाठी वापरलेले पाणी फेकू नका. मिक्सरच्या भांड्यात आल्याचा तुकडा घ्यायचा. लसणाच्या काही पाकळ्या घ्यायच्या. शिजवण्यासाठी वापरलेले पाणी घालायचे. थोडेच पाणी घाला. छोलेही सगळे नाही थोडेच घालायचे. वाटून त्याची पेस्ट तयार करायची.
३. एका कढईत थोडं तूप घ्यायचं. तुपावर बारीक चिरलेला कांदा छान खमंग परतायचा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात थोडी हळद घाला. चवीनुसार मीठ घाला. तसेच थोडे लाल तिखट आणि धणे पूडही घाला. सगळं छान परतल्यावर त्यात वाटलेली छोल्यांची पेस्ट घाला. मिक्स करुन घ्या आणि शिजू द्या. झाकण ठेवा आणि एक वाफ काढून घ्या. नंतर त्यात उरलेलं पाणी घाला. कमी पडलं तर साधं पाणीही घाला. मध्यम घट्ट झाल्यावर त्यात उकडलेले छोले घाला आणि झाकण ठेवून वाफवा.
४. हिरव्या मिरचीचे लांब पातळ काप करायचे. तसेच लसणाच्या पाकळ्याही लांब पातळ चिरायच्या. थोडं आलंही लांब चिरायचं. एका फोडणी पात्रात तूप घ्यायचे. त्यावर थोडे जिरे परतून घ्यायचे. सुकी मिरची घालायची. हिरव्या मिरचीचे काप, लसणाचे काप आणि आल्याचे कापही घालायचे. थोडं हिंग घाला. छान खमंग परतून घ्यायचे. कसुरी मेथी घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला सगळं खमंग परता आणि फोडणी भाजीवर ओता. त्यात बटाट्याचे तुकडे घाला सगळं मिक्स करुन घ्या.
