तुमची त्वचा ऑइली आहे ? सारखा घाम येतो आणि चेहराही चिकट होतो.त्यावर धूळ , माती , सगळंच चिकटून बसतं आणि त्यामुळे खाज सुटते? मग फक्त तुम्हीच नाही तर आजकाल अनेकांना चेहऱ्यावर जास्त तेल (oil) येण्याची समस्या जाणवते. त्यामुळे चेहरा चिकट दिसतो, पिंपल्स वाढतात आणि त्वचा निस्तेज वाटते. (Home remedies for oily skin - perfect solutions for taking care of skin )पण काळजी करू नका, काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही हे ऑइल कंट्रोल करू शकता. मुळात त्वचा तेलकट असली तरी काही उपाय करुन त्यामुळे होणारे त्रास आटोक्यात ठेवता येतात.
सर्वप्रथम, चेहरा नियमितपणे स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा. जास्त वेळा धुतल्यास त्वचा आणखी तेल तयार करू शकते, त्यामुळे अति करू नका. सारखा चेहरा धुत राहीलात तर इतर थर निघून जातात आणि जास्त तेल बाहेर येते. त्यामुळे फक्त पाणीसुद्धा सतत मारू नका.
बेसन आणि हळदीचा फेसपॅक हा खूप जुना आणि प्रभावी उपाय आहे. एका वाटीत २ चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि थोडं गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १० ते १५ मिनिटांनी धुवा. यामुळे अतिरिक्त तेल कमी होऊन त्वचा ताजीतवानी दिसते. बेसन तेल काढून टाकते आणि त्वचा कोरडी करते. पण सोबत गुलाबपाणी असेल तर त्वचा कोरडी राहत नाही. तिला गरजेचे पोषण मिळतंच.
मलइदार पदार्थ टाळून मुलतानी माती वापरणे हा आणखी एक उत्तम उपाय आहे. मुलतानी मातीमध्ये नैसर्गिकरित्या तेल शोषण्याची क्षमता असते. त्यात गुलाबपाणी किंवा साधं पाणी घालून पेस्ट बनवा आणि आठवड्यातून १-२ वेळा लावा.
टोमॅटोचा रसही ऑइल कंट्रोलसाठी फायदेशीर ठरतो. टोमॅटोमध्ये नैसर्गिक ऍसिड्स असतात जे त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करतात. टोमॅटोचा तुकडा हलक्या हाताने चेहऱ्यावर चोळा आणि काही वेळाने धुवा.
काकडी (cucumber) ही त्वचेला थंडावा देणारी आणि ऑइल कमी करणारी असते. काकडीचा रस काढून कॉटनने चेहर्यावर लावा. यामुळे त्वचा फ्रेश वाटते आणि पोर्सही टाईट होतात. तसेच, भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शरीर हायड्रेट राहिल्यास त्वचा संतुलित राहते आणि तेलाचे प्रमाण कमी होते. शेवटी, तेलकट आणि तळलेले पदार्थ कमी खाणे गरजेचे आहे. आहाराचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो, त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या.
अशा सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही चेहऱ्यावरील अतिरिक्त ऑइल नियंत्रणात ठेवू शकता आणि त्वचेला नैसर्गिक तेज देऊ शकता.
