2.0 Movie Review : नुसताच भडीमार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 03:44 PM2018-11-29T15:44:40+5:302023-08-08T19:28:38+5:30

रजनीकांत व अक्षय कुमारचा 2.0 हा चित्रपट आज गुरुवारी प्रदर्शित झाला. जाणून घेऊ यात, कसा आहे हा चित्रपट...

2.0 Movie Review | 2.0 Movie Review : नुसताच भडीमार!

2.0 Movie Review : नुसताच भडीमार!

Release Date: November 29,2018Language: हिंदी
Cast: रजनीकांत, अक्षय कुमार, एमी जॅक्सन, आदिल हुसैन 
Producer: ए सुब्बाकरण, के करुणामुर्थी Director: एस शंकर
Duration: २ तास २८ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत

रजनीकांतअक्षय कुमारचा2.0 हा चित्रपट आज गुरुवारी प्रदर्शित झाला. जाणून घेऊ यात, कसा आहे हा चित्रपट...

2.0 हा  मोबाईल फोनमुळे होणा-या नुकसानावर लांबलचक भाष्य करणारा ‘जाहिरातपट’ आहे आणि हे सगळे पडद्यावर पाहणे तितकेच रटाळ  व कंटाळवाणे आहे. अर्थात कथेला वास्तवाचा कुठलाही स्पर्श नसताना, केवळ ‘स्पेशल इफेक्ट’च्या जोरावर तब्बल अडीच तास चित्रपट खेचण्याचे टॅलेंट दिग्दर्शक एस. शंकर याच्याकडे आहे आणि त्यांनी ते पूरेपूर सिद्ध केले आहे. डोक्याचा भूगा करणारी अ‍ॅक्शन आणि स्पेशल इफेक्टचा भडीमार करून शंकर आपले अडीच  तास वाया घालवण्यात यशस्वी ठरतो, इतकेच हा चित्रपट पाहिल्यानंतर म्हणता येईल.
2.0 चा प्रीक्वल ‘ Enthiran’ हा चित्रपट रोबोटिक एक्स्पर्ट डॉ. वसीकरण (रजनीकांत) याची कथा होती. त्याने बनवलेला चिट्टी रोबो (रजनीकांत ) हा कृत्रिम बुद्धी आणि मानवी भावभावनांचा एक अद्भूत अविष्कार असतो. पण चिट्टीच्या भावना त्याच्या बुद्धीवर हावी होतात तेव्हा तो हाताबाहेर जातो आणि उद्रेक करतो. त्याच्या अत्याचाराला कंटाळून चिट्टीची चिप काढून त्याला निष्प्रभ केले जाते. इथून 2.0 या चित्रपटाची कथा सुरू होते. चेन्नई शहरात अचानक मोबाईल फोन गायब व्हायला लागतात आणि हेच मोबाईल फोन नंतर लोकांवर आक्रमण करायला लागतात. यात तीन लोकांचे बळी जातात. या आक्रमणापासून लोकांना वाचवण्यासाठी लष्कराला पाचारण केले जाते. पण लष्कराचाही उपयोग होत नाही. या स्थितीशी निपटण्यासाठी एक उच्चस्तरिय बैठक बोलवली जाते आणि या बैठकीत   चिट्टीला पुन्हा जीवनदान देऊन लोकांची मदत करण्याची विनंती वसीकरणला केली जाते. यानंतर सुरू होते पक्षीराज (अक्षय कुमार) व चिट्टीतील घमासान. पक्षीराज लोकांवर आक्रमण का करतो? त्याच्या मोबाईल फोनच्या पराकोटीचा द्वेषामागे नेमके काय कारण असते? त्याला कुणाचा सूड उगवायचा असतो? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपट प्रत्यक्षचं बघावा लागले.
चित्रपटाबद्दल सांगायचे तर पहिला भाग अतिशय कंटाळवाणा आहे. यातील बराचसा वेळ मोबाईल फोनच्या स्पेशल इफेक्ट्समध्ये निघून जातो. पहिल्या भागाच्या तुलनेत दुसरा भाग किंचित तरी सुसह्य वाटतो. खरे तर रजनीच्या बहुतांश चित्रपटांची जमेची बाजू असलेले त्याचे संवाद, त्याची गाणी, विनोद, रोमान्स, स्टाईल असे काहीच या चित्रपटात नाही. अगदी साईड हिरो सुद्धा नाही. आहेत ते केवळ एकापाठोपाठ एक येणारे अ‍ॅक्शन सीन्स अन् एकापेक्षा एक भव्य व्हीज्युअल इफेक्ट्सचा भडीमार. या स्पेशल इफेक्टऐवजी कथेवर लक्ष दिले गेले असते तर हा चित्रपट अधिक मनोरंजक झाला असता. थोडक्यात रजनीच्या स्टारडमचाही कुठलाही प्रभाव चित्रपटात दिसत नाही. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात जावून बघण्याचे कष्ट न घेतलेले बरे...!

Web Title: 2.0 Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.