राजघराण्याचा उमेदवार अन् माजी पाेलिसात लढत; राजसमंद मतदारसंघात चुरशीची लढत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 09:00 IST2024-04-22T08:59:37+5:302024-04-22T09:00:37+5:30
या मतदारसंघात गुर्जर मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे काँग्रेसने गुर्जर उमेदवार देऊन नवा डाव टाकला आहे.

राजघराण्याचा उमेदवार अन् माजी पाेलिसात लढत; राजसमंद मतदारसंघात चुरशीची लढत
विलास शिवणीकर
राजसमंद : राजस्थानातील राजसमंद या मतदारसंघातून भाजपने मेवाड राजघराण्याच्या महिमा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती विश्वराज सिंह हे भाजपचे आमदार आहेत. २०१९ मध्ये येथून दीया कुमारी या भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या होत्या. नंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली आणि उपमुख्यमंत्री झाल्या.
काँग्रेसने येथून सुदर्शन सिंह यांना तिकीट दिले होते. पण, आपण निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेसने डॉ. दामोदर गुर्जर यांना येथून रिंगणात उतरविले आहे.पोलिस खात्यात नोकरी केल्यानंतर ते राजकारणात आले आहेत. या मतदारसंघात गुर्जर मतदारांचा प्रभाव आहे. त्यामुळे काँग्रेसने गुर्जर उमेदवार देऊन नवा डाव टाकला आहे.
काय आहेत कळीचे मुद्दे
भाजपच्या उमेदवार महिमा सिंह यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जात माहिती दडविल्याचा आरोप आहे. राजस्थान हायकोर्टाने महिमा सिंह यांना नोटीसही पाठविली आहे. त्यांचे पती विश्वराज सिंह यांनाही नोटीस पाठविण्यात आली असून ६ मेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. काँग्रेसने दिलेले तिकीट सुदर्शन सिंह यांनी नाकारल्यानंतर भाजपने हल्लाबोल केला. काँग्रेसचे नेते हात जोडून तिकीटापासून दूर पळत आहेत, अशी टीका भाजपने केली.