पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:15 IST2026-01-17T09:14:58+5:302026-01-17T09:15:56+5:30
Ajit Pawar Meets Sharad Pawar in Govindbag: पुणे महानगरपालिकेत भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवत १२० जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत लढा दिला होता.

पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले...
बारामती: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर आज राज्याच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडली आहे. निवडणुकीचे निकाल पूर्णपणे हाती येताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीतील त्यांच्या 'गोविंदबाग' या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी शप गटाचे खासदार अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे या आधीपासूनच गोविंदबागेत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पुणे महानगरपालिकेत भाजपने पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवत १२० जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र येत लढा दिला होता. या धक्कादायक निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये होणारी ही पहिलीच भेट आहे. ही भेट कौटुंबिक नसून यामागे काही मोठे राजकीय संकेत दडलेले आहेत, यावर सध्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली
अजित पवार गोविंदबागेत पोहोचताच बारामतीसह संपूर्ण पुण्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भविष्यातील वाटचालीवर किंवा महापालिकेत मिळून विरोधी पक्ष म्हणून काम करण्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार आणि शरद पवार पक्ष एकत्र येण्याची देखील शक्यता आहे. राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत. यामुळे भाजपला टक्कर द्यायची असेल, अस्तित्व टिकवायचे असेल तर दोन्ही पक्षांना एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.