PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:48 IST2026-01-16T15:45:34+5:302026-01-16T15:48:09+5:30
PMC Election Results 2026 पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली असून अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.

PMC Election Results 2026: पुणेकरांना नको मेट्रो अन् बस फुकट; पुण्यात आता फक्त भाजपचं बळकट
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि काँग्रेस, उद्धवसेना व मनसे हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. अनेकजण राजकीय पक्ष बदलून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवक एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजप , शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि काँग्रेस-उद्धवसेना-मनसे या चौरंगी लढतीमुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
पुण्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवणार असल्याचे सांगितले होते. त्यादिशेने भाजपची वाटचाल सुरु आहे. आता मिळालेल्या आकडेवारीनुसर भाजप ८० जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी ७, शिवसेना २ आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. तर शरद पवार पक्षाचे ३ उमेदवर आघाडीवर आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार लढत आहेत.
अजित पवारांचे स्वप्न भंगले
अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने सभांचा धडाका लावला होता. दोन्हीकडे भाजपवर टीकाही केली होती. तर पुण्यात मेट्रो आणि बस प्रवास फुकट देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुणेकरांना हे आश्वासन रुचले नसल्याचे दिसून आले आहे. पुण्यात नागरिकांनी भाजपला सत्तेची संधी दिली आहे. त्यामुळे अजित पवारांचे सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता टोला
अजित पवारांच्या फुकट मेट्रो बस देण्याच्या आश्वासनावर देवेंद्र फडणवीस यांनी पतिक्रिया दिली होती. पुणेकरांना काही फुकट नको. त्यांना सगळे व्यवस्थित आणि चांगलं हवं आहे. फुकट देण्याचे आश्वासन द्यायला काय जातंय. असं म्हणत त्यांनी महिलांना विमानप्रवास मोफत देतो हे असं बोलायला काय जातंय असं म्हणत टोला लगावला होता.