PMC Election 2026: पुण्यात महायुतीची नुरा कुस्ती; अजित पवार यांच्या भाजपवरील टीकेवरून काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:31 IST2026-01-08T12:28:46+5:302026-01-08T12:31:08+5:30
या दोन्ही पक्षांच्या विरोधात पुणेकर काँग्रेस-उद्धवसेना आघाडीला मतदान करतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला.

PMC Election 2026: पुण्यात महायुतीची नुरा कुस्ती; अजित पवार यांच्या भाजपवरील टीकेवरून काँग्रेसचा टोला
पुणे : भाजपच्या कार्यकाळात महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच केली आहे. पवार हे राज्यात महायुतीमध्ये सत्तेत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातील ही नुरा कुस्ती आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या विरोधात पुणेकर काँग्रेस-उद्धवसेना आघाडीला मतदान करतील, असा दावा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला.
काँग्रेस-उद्धवसेना आघाडीच्यावतीने काँग्रेस भवनात सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जोशी बोलत होते. यावेळी वीरेंद्र किराड, अजित दरेकर उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘विरोधकांना जागा राहू नये, या उद्देशाने महायुतीतील तिन्ही पक्ष महापालिका निवडणुकीत परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात आधीच ठरलेली ही नुरा कुस्ती आहे. राज्यात सत्तेत असतानाही अजित पवार यांनी पुण्यातील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारावर टीका केली. ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे, पुणेकरांनी या दोन्ही पक्षांना बाजूला ठेवून विरोधी पक्षांना महापालिकेवर निवडून द्यावे.’
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम हे येणार आहेत. उद्धवसेनेकडून आदित्य ठाकरे, भास्कर जाधव प्रचाराला येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. काँग्रेसचा जाहीरनामा ८ जानेवारीला प्रकाशित करण्यात येणार आहे. उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्याकडून समोरासमोर उमेदवारी अर्ज भरलेल्या बहुतेक ठिकाणी एका उमेदवाराची माघार झाली आहे. बिनविरोध निवडून झालेल्या जागांबाबत विचारणा केली असता, जोशी म्हणाले की, राजकीय पक्षाची उमेदवारी घेताना पक्षाचा एबी फॉर्म पक्षाकडून घेतला जातो. त्याच पद्धतीने तो उमेदवार माघार घेणार असेल, तर राजकीय पक्षाकडूनही पत्र घेण्यात यावे, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहोत.