no easier "MP" Amol Kolhe's journey | '' खासदार '' अमोल कोल्हे यांनाही तारेवरची कसरत चुकणार नाही 
'' खासदार '' अमोल कोल्हे यांनाही तारेवरची कसरत चुकणार नाही 

ठळक मुद्देहवेली तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर :  नागरी सुविधांवर ताण, वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याची गरज

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील बहुतांश गावांना सतावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या नागरीकरणामुळे नागरी सुविधांवर येणारा ताण, महामार्गावर नेहमी होत असलेली वाहतूककोंडी या समस्या सोडविण्यासाठी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 
पुणे शहरालगत विखुरला गेलेला हा तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असूनही केवळ स्थानिक राजकीय नेत्यांचे आपापसांतील मतभेद व वैैमनस्य यांमुळे होणारे कुरघोडीचे राजकारण यात सर्वसामान्य भरडला जात आहे. हवेली तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या तालुक्यांत गेल्या सात वर्षांपासून शासनाकडून वेळोवेळी सुरू करण्याचे आश्वासन मिळून आजअखेर बंद असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याबरोबरच बहुतांश मूलभूत प्रश्न अद्यापही जैसे थे आहे.
सध्या केंद्र व राज्यात भाजपचे सरकार आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व भाजप आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केलेल्या जाहिरातीनुसार काही गावांतील अंतर्गत रस्ते सिमेंटचे झाले; परंतु बहुतांश गावांकडे जाणारे रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून जनता त्यावेळीही वंचित होती व आजही त्यांत फारसा फरक पडलेला नाही. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर आजही अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे, त्यांमुळे पर्यटक व भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजकारण्यांकडून फक्त आश्वासने मिळतात; परंतु साध्य मात्र काहीच होत नाही.

माजी खासदार व विद्यमान आमदारांनी यशवंत प्रश्नी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तो पूर्ववैभवांत आहे, त्या ठिकाणावर सुरू करणार अशी घोषणा गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा केली. परंतु, तो अद्याप सुरू न झाल्याने सुमारे २० हजार शेतकरी सभासद व १ हजार कामगार यांच्या आशेवर पाणी पडले. यासर्व कारणांमुळे जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. तसेच तालुक्यातील अनेक लहानमोठ्या गावांमधून निघालेला कचरा रिचवण्यासाठी जागा अथवा त्यांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती यंत्रना उपलब्ध नसल्याने परिसरातील जैविक आरोग्य धोक्यात आले आहे. 
पुणे-सोलापूर, पुणे-नगर, पुणे-बंगळुरू हे तीन महामार्ग व पुणे - सासवड राज्यमार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी गाव तेथे उड्डाणपूल काळाची गरज बनली आहे, याचबरोबर रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे. लोकसभेच्या मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदारांनी हा राग मतदानाद्वारे व्यक्त करून राष्ट्रवादीला झिडकारले होते. पक्षाचे नेते बदलले, परंतु आजही ते प्रश्न कायम आहेत. त्यामुळेच मतदारांनी या वेळी आपला खासदार बदलला आहे. 

पुणे शहरालगत २५ ते ३० किमी अंतरावर असलेल्या गावांना महानगरपालिकेने विनाअट पिण्यासाठी बंदनलिकेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून सर्वच स्तरांतून होत आहे. स्थानिक नेत्यांना फक्त निवडणूक आली की पाणीप्रश्न आठवतो. पिंपरी-चिंचवड व पुणे महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांनी वापरलेले व विविध  कारखान्यांतून कोणतीही प्रक्रिया न करता जसेच्या तसे मुळा-मुठा नदीत पाणी सोडल्याने नदीची गटारगंगा झाली आहे. त्यामुळे नदीतीरावर राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने अनेकांनी स्थलांतर केले, तर जुन्या कालव्यातून नदीचेच पाणी जसेच्या तसे सोडण्यात येत असल्याने पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित होत आहेत. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींच्या जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित आहेत, त्यांनी शुद्ध पाणी पुरवण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे. तेथील पाण्याची शुद्धता तपासणे गरजेचे आहे.
नदीपलीकडील गावात आजही भारनियमन होत असल्याने त्याचा परिणाम शेतीवर होत असून, त्यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. याचबरोवर तालुक्यात असणारी छोटी-मोठी कारखानदारी व तेथे विविध प्रकारचे ठेके घेण्यासाठी लागलेली स्पर्धा यात स्थानिक नेते पुढाकार घेतात. या पायी दोन गटांत अनेकदा वाद उद्भवतात. 
येथील जमिनीला सोन्याचा भाव आल्याने भाऊबंदकीच्या वादाने कळस गाठला असून, त्यामुळे अनेकांना जिवाला मुकावे लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा
पोहोचत आहे. यामध्ये जास्त 
प्रमाणात राजकीय व्यक्ती अथवा त्यांचे आप्तेष्ट अथवा कार्यकर्ते असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे काम वाढले आहे. पूर्व हवेलीत 
पहिले दोन रिंगरोड प्रस्तावित 
आहेत. त्यांचे अद्याप काम सुरू झालेले नाही. असे असताना तिसरा रिंगरोड करणार असल्याचा घाट घालण्यात आलेला असून, त्यामध्ये फूलउत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोरतापवाडी गावची ८० टक्के बागायती जमीन जाणार आहे. 
हा रिंगरोड होऊ नये म्हणून अनेक निवेदने देण्यात आली. परंतु जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत. ही लोकप्रतिनिधींची मानसिकता नसल्याने हवेलीतील जनतेसमवेत शेतकरीही हवालदिल झालेले आहेत. या सर्व ज्वलंत समस्यांच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक आली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रिक केली होती. यावेळी ते चौकार मारण्याच्या तयारीत होते. परंतु, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हेंच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगला व सक्षम उमेदवार सापडला आणी त्यांनी पाटील यांची विकेट अलगद काढली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सलग तीन निवडणुकांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडित केली. आढळराव पाटील यांना प्रस्थापितांविरोधी मतदानाचा फटका बसला त्याचबरोबर वरील सर्व प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवून केवळ आश्वासनांची खैैरात केल्यामुळे मतदारराजाने त्यांच्याबाबत असलेली नाराजी मतदान यंत्रातून प्रकट केली व भरभरून आपल्या मतांचे दान डॉ. अमोल कोल्हे यांच्या झोळीत टाकले. कोल्हे निवडून आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या भावना वाढल्या आहेत. ते येत्या पाच वर्षांत यातून मार्ग काढतील, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.
 ......
 

Web Title: no easier "MP" Amol Kolhe's journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.