महापालिकांची रणधुमाळी: प्रचाराला सुरुवात, वादाचा नारळ फुटला; पुणे-मुंबईत तोफा धडाडू लागल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 05:56 IST2026-01-04T05:55:19+5:302026-01-04T05:56:59+5:30
पुण्यात भ्रष्टाचार, गुंडगिरीच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी; मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संयुक्त सभेतून ठाकरे बंधूंवर थेट निशाणा

महापालिकांची रणधुमाळी: प्रचाराला सुरुवात, वादाचा नारळ फुटला; पुणे-मुंबईत तोफा धडाडू लागल्या
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकांवरून चांगलीच जुंपली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केल्यानंतर आता भाजपनेही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गुन्हेगार व्यक्ती थेट परदेशात पळून जातेच कशी? असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला होता भाजपने जनतेची कामे करण्यापेक्षा भ्रष्टाचार करण्यावरच जास्त भर दिला, अशी टीकाही पवार यांनी केली होती.
त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आम्ही आरोप करू लागलो, तर फार अडचणी निर्माण होतील, असा इशारा पवारांना दिला. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘मुख्यमंत्री व गृहमंत्री आमच्याकडे आहेत. त्यामुळे दमात घेऊ नका, हलक्यातही घेऊ नका’ असा इशारा पाटील यांनी पवारांना दिला.
आम्ही आरोप करू लागलो, तर फार अडचणी निर्माण होतील : चव्हाण
भाजपवर आरोप करण्यापूर्वी अजित पवार यांनी स्वतःमध्ये डोकावून पाहावे. आम्ही आरोप करू लागलो, तर फार अडचणी निर्माण होतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला. अजित पवारांना युतीत घेतल्याचा पश्चात्ताप होत असल्याचे कार्यकर्ते रोज सांगतात, मी देखील फडणवीस यांना म्हटले होते, की अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
टीका करायचे काम तेच करतायत : सामंत
आपल्याला तेरा दिवसांत समोरच्याचा तेरावा घालायचा आहे. महापालिकेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध शिवशक्ती होणार आहे. आपल्याला कुणावरती टीका करण्याची गरज नाही, टीका करण्याचे काम अजित पवार करत आहेत, असा टोला शिंदेसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी लगावला.
मोहोळ यांचा राजीनामा घ्या : सपकाळ
अजित पवार यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. गुंडांस परदेशात जाण्यास मदत करणे हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे आहे. मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घेऊन सीबीआय चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकांच्या उमेदवारीचे अंतिम चित्र स्पष्ट होताच आता सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्येच संघर्षाच्या फैरी झडू लागल्या आहेत. नगरपरिषद निवडणुकीत भाजप-शिंदेसेना असा संघर्ष पाहायला मिळाला, तर आता भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात वादाला तोंड फुटले आहे.
‘ही तर क्रेडिट चोरांची टोळी’
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इतकी वर्षे त्यांनी भ्रष्टाचार, अनाचार आणि दुराचार एवढेच करून दाखविले, आम्ही काय केले त्याची स्मारके मुंबईत जागोजागी दिसत आहेत. तरीही आमचे क्रेडिट चोरणारी बोलबच्चनांची टोळी मुंबईत फिरत आहे असे जोरदार टीकास्र उद्धव ठाकरेंवर सोडतानाच, आता मुंबईत महायुतीचीच सत्ता येणार असून आम्ही एकाही मराठी माणसावर मुंबई सोडून जाण्याची पाळी येऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
भाजप-शिंदेसेनेच्या वतीने वरळीच्या एनएससीआय डोममध्ये प्रचार प्रारंभाच्या मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री आशिष शेलार, नितेश राणे, योगेश कदम, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, रामदास कदम आदी नेते उपस्थित होते. दोघे भाऊ एकत्र आले आता कसे लढणार असे पत्रकारांनी मला विचारल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देखकर धुंधलीसी ताकद हौसला हमारा कम नही होता. झुठी आंधीसे वह डरे जिन चिरागोंमे दम नही होता.
‘टेंडर तिथे सरेंडर, हे तर करप्शनसम्राट’
टेंडर आले की ते सरेंडर व्हायचे, ते कसले कार्यसम्राट, ते तर करप्शनसम्राट. त्यांचा ‘म’ मलिद्याचा, मतलबाचा आणि मुजोरीचा आहे. आहे, आमचा ‘म’ मराठीचा, महायुतीचा आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यावर या मेळाव्यात बोलताना केला.
शिंदे यांनी नाव न घेता ठाकरेंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, तुम्ही अस्मिता विकली. ज्या काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसच्या मांडीवर बसलात. आता त्यांनीही लाथ मारली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचे पुण्य आम्हाला मिळाले. यांचा मराठी भाषेचा पुळका खोटा आहे. त्यांना पुळका फक्त महापालिकेच्या तिजोरीचा आहे, अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली.