मावळ लोकसभा निकाल २०१९ :पवार यांच्या घराणेशाहीला धक्का, शिवसेना राखणार मावळचा गड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 14:04 IST2019-05-23T14:01:06+5:302019-05-23T14:04:17+5:30
शिवसेनेचे खासदार व उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुमारे दीड लाखांचे मताधिक्य घेत मावळचा गड राखला आहे.

मावळ लोकसभा निकाल २०१९ :पवार यांच्या घराणेशाहीला धक्का, शिवसेना राखणार मावळचा गड
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत आहेत. शिवसेनेचे खासदार व उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुमारे दीड लाखांचे मताधिक्य घेत मावळचा गड राखला आहे. त्यामुळे पवार यांच्या घराणेशाहीला धक्का बसला असून, पवार यांची पावर गुल झाली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ आणि २०१४ या दोन्ही निवडणुकांत राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडखोरीचा फायदा घेत शिवसेनेचे गजानन बाबर व श्रीरंग बारणे विजयी झाले होते. त्यामुळे मावळचा गड राखण्यासाठी अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांना रिंगणात उतरविले होते. त्यासाठी राज्यभरातून अजित पवार समर्थक राष्ट्रवादीचे आजी-माजी मंत्री, आमदार हे मावळ मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात कार्यरत झाले होते. राष्ट्रवादीने मावळात मोठी ताकद लावली होती. मात्र, उमेदवार पार्थ यांची उमेज कमी पडली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध कारणांमुळे पार्थ पवार यांच्याविषयी नकारात्मक चर्चा होती. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे.
शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक भाजपा नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर शिवसेनेतील एक गटही बारणेच्या विरोधात काम करीत होता. परंतु, बारणे यांनी थेट मतदारांशी संपर्क साधत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निवडून देण्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले. मावळ लोकसभेतील स्थानिक उमेदवार असल्याने सर्व विधानसभेत त्यांचा चांगला संपर्क होता. शिवाय स्वच्छ प्रतिमा आणि त्यांच्याविरोधात कोणताही नकारात्मक मुद्दा नसल्याने मतदारांनी त्यांना कौल दिल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
-------------