Lok Sabha Maval election: Pune, Baramatikar's going for campaining in Maval, Shirur | लोकसभा मावळ निवडणूक:  पुणे, बारामतीकरांचा मावळ, शिरूरकडे मोर्चा
लोकसभा मावळ निवडणूक:  पुणे, बारामतीकरांचा मावळ, शिरूरकडे मोर्चा

ठळक मुद्देमहायुती, महाआघाडीचे नेते अन् कार्यकर्त्यांची येणार फौजपुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी पुणे आणि बारामतीचे मतदान झाले मंगळवारी, मावळ आणि शिरूर सोमवारी

पिंपरी : पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान मंगळवारी झाले. मतदान करवून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते पुणे आणि बारामतीला गेले होते. मावळ आणि शिरूरचे मतदान सोमवारी (२९ एप्रिल) असल्याने पुणे आणि बारामतीकरांचा मोर्चा उद्यापासून दोन मतदारसंघांकडे वळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघांपैकी पुणे आणि बारामतीचे मतदान मंगळवारी झाले, तर मावळ आणि शिरूरचे मतदान सोमवारी आहे. तिस-या टप्प्यासाठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते पुणे आणि बारामतीमध्ये तळ ठोकून होते. चौथ्या टप्प्यात मावळ व शिरूर लोकसभेची निवडणूक असल्याने  पुण्याएवढी पिंपरी-चिंचवड परिसरात रणधुमाळीत रंग भरला नव्हता. अत्यंत कमी प्रमाणावर प्रचार सभा, कोपरा बैठका आणि प्रचार फेºया होत होत्या.  
पुणे आणि बारामतीतील मतदानासाठी गेल्या दोन दिवसांपासून या दोन मतदारसंघांतील कार्यकर्ते तळ ठोकून होते. युती आणि आघाडीचे कार्यकर्ते बूथवरही नियुक्त केले होते. मतदानाची टक्केवारी अधिक प्रमाणावर घडवून आणण्यासाठी सर्वच पक्षांनी जोर लावला होता, तर जाहीर प्रचार संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी छुप्या बैठकांचेही आयोजन केले होते. मतदारसंवाद आणि मते वळविण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले होते.


बुधवारपासून कार्यकर्ते अ‍ॅक्टिव्ह
मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने पुण्यात गेलेले मावळ आणि शिरूरमधील कार्यकर्ते पुन्हा मतदारसंघात दाखल होणार आहेत. त्याचबरोबर रणधुमाळी संपल्यामुळे बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मावळ आणि शिरूरमध्ये दाखल होणार आहे.
...........
राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या होणार सभा 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, विजय शिवतारे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, अमर साबळे, दिलीप कांबळे यांच्यासह आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी उद्यापासून तळ ठोकून राहणार आहेत. पुढील चार दिवसांत राज्य आणि राष्टÑीय पातळीवरील नेत्यांच्या सभांचेही आयोजन केले आहे. युतीची प्रचार यंत्रणा व्यवस्थितपणे सुरू आहे किंवा नाही, यावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे लक्ष आहे. तसेच आघाडीच्या वतीने पिंपरी ते पनवेलपर्यंत हॉटेल, ढाबे आरक्षित केले असल्याची चर्चा आहे.  


Web Title: Lok Sabha Maval election: Pune, Baramatikar's going for campaining in Maval, Shirur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.