देशात सर्वाधिक वाहन चोरी कुठे होते, चोरांचा आवडता रंग कोणता? रिपोर्टमधून अनेक खुलासे; वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 07:30 PM2022-10-17T19:30:59+5:302022-10-17T19:33:38+5:30

तुम्ही वाहन चोरींच्या अनेक घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील. पण, चोर कोणती गाडी आणि कुठून चोरी करतो, याबाबत विचार केला आहे का...

बाजारात, निर्जण परिसरात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने चोरीला गेल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात. पण, तुम्ही कधी विचार केलाय का, या चोरांची आवडती गाडी कोणती आणि कोणत्या शहरामध्ये सर्वाधिक वाहने चोरीला जातात. आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. एको व्हीकल थेफ्ट रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दिल्लीत सर्वाधिक वाहन चोरी- दिल्ली एनसीआरमध्ये देशात सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना घडतात. चोरांचा आवडता रंग पांढरा आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. म्हणजेच पांढऱ्या रंगाची वाहने चोरीला जातात. एका अहवालातून ही सर्व माहिती समोर आली आहे. हे सर्व इको वाहन चोरीच्या अहवालात सांगण्यात आले आहे. अहवालानुसार, दिल्लीच्या उत्तरेकडील रोहिणी, भजनपुरा, दयालपूर आणि सुलतानपुरी भागातून अधिक वाहने चोरीला जातात. पश्चिमेकडील उत्तम नगर, नोएडातील सेक्टर 12 आणि गुरुग्राममधील दक्षिण शहर 1 येथे वाहन चोरीचे प्रमाण जास्त आहे.

चोरांना कोणत्या गाड्या आवडतात?- रिपोर्टनुसार, भारताची राजधानी दिल्लीत दर 12 मिनिटांनी एक वाहन चोरीला जाते. दिल्लीत नोंदवलेल्या एकूण गुन्ह्यांपैकी सुमारे 20 टक्के गुन्ह्यांमध्ये वाहनचोरीचे प्रमाण आहे. ज्या वाहनांची बाजारात सर्वाधिक मागणी आहे, अशा वाहनांची चोरी सर्वाधिक आहे. दिल्लीत सर्वाधिक मारुती वॅगनआर आणि स्विफ्ट वाहनांची चोरी होत असल्याचेही समोर आले आहे. तसेच, दुचाकींमध्ये हिरो स्प्लेंडरची सर्वाधिक चोरी होते. यानंतर अॅक्टिव्हा स्कूटी, बजाज पल्सर, रॉयल इनफील्ड Classic 350, आणि टीव्हीएस आपाचे या गाड्यांचा समावेश आहे.

पांढऱ्या वाहनांची चोरी सर्वाधिक का?- रिपोर्टनुसार, दिल्ली एनसीआरनंतर बंगळुरूमध्ये सर्वाधिक चोरी होते. चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, हैदराबाद, मुंबई आणि कोलकाता ही शहरे देशातील सर्वात कमी वाहन चोरीची शहरे म्हणून ओळखली जातात. कारच्या रंगाचा विचार केला, तर पांढऱ्या रंगाच्या कार सर्वाधिक चोरल्या जातात. पांढर्‍या गाड्या ट्रॅफिकमध्ये सहज मिसळून जातात, असा सर्वसाधारण तर्क आहे. याशिवाय पांढऱ्या कारला दुसऱ्या रंगात रंगवणे सोपे जाते.

अखेर दिल्लीत सर्वाधिक चोरी का होते?- दिल्ली एनसीआर अनेक कारणांमुळे भारतात वाहन चोरीच्या बाबतीत आघाडीवर आहे. मुख्यतः घरे आणि वसाहतींमध्ये पार्किंगची कमतरता. येथे नागरिकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. हा अहवाल जारी करताना कंपनीचे मोटर अंडररायटिंगचे संचालक अनिमेश दास म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या सततच्या वाढीमुळे आणि अधिकाधिक लोक वाहने खरेदी करत असल्याने वाहन चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचा अंदाज आहे. ही रिपोर्ट काढण्याचे कारण म्हणजे, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि या घटनांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.