प्रेरणादायी! 'बेकरी' कर्मचाऱ्याची लेक भारी, फातिमाची गगनभरारी; हैदराबादची पहिली पायलट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 11:45 AM2023-03-03T11:45:49+5:302023-03-03T12:00:06+5:30

तेलंगणाची राजधानी हैदराबादची पहिली महिला कमर्शियल पायलट सैयदा सल्वा फातिमाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आणि चढ-उतरांना भरलेला आहे. यु सीटर सेसना ते Airbus ३२० विमानांचे उड्डाण करत फातिमाने गगनभरारी घेतलीय. विशेष म्हणजे फातिमा एका बेकरी कर्मचाऱ्याची मुलगी असून तिने परिस्थितीवर मात करत यशाचं उत्तुंग शिखर गाठलंय.

तेलंगणाची राजधानी हैदराबादची पहिली महिला कमर्शियल पायलट सैयदा सल्वा फातिमाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आणि चढ-उतरांना भरलेला आहे. यु सीटर सेसना ते Airbus ३२० विमानांचे उड्डाण करत फातिमाने गगनभरारी घेतलीय. विशेष म्हणजे फातिमा एका बेकरी कर्मचाऱ्याची मुलगी असून तिने परिस्थितीवर मात करत यशाचं उत्तुंग शिखर गाठलंय.

फातिमाचा जन्म मोगलपुरा येथील एका गरीब मुस्लीम कुटुंबात झाला. घरची परिस्थिती हालाकीची असतानाही तिने आकाशी झेप घेण्याचं स्वप्न पाहिलं. केवळ स्वप्न न पाहता, आपल्या स्वप्नाचा पाठलागही केला.

तिच्या संघर्षमयी प्रवासातून आज देशातील कोट्यवधी मुलींसाठी फातिमा एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनलीय. महिला सशक्तीकरणाचंही उदाहरण तिने समाजासमोर ठेवलंय.

देशात हातातील बोटावर मोजण्याएवढ्याच मुस्लीम कमर्शियल महिला पायलट आहेत, त्यामध्ये आता फातिमाने आपले स्थान निश्चित केलंय. परंपरागत समाजातील रुढी आणि आर्थिक तंगीतूनही तिने स्वत:ला सिद्ध केलंय.

सईदाचे वडिल सैयद अशफाक अहमद लाडाने तिला 'Miracle Girl' असे म्हणतात. फातिमा आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडण्याच्या विचारात होती, पण तिच्या शाळेतील प्रोफेसरने दोन वर्षे तिला शिक्षणात मदत केली.

फातिमा कुटुंबात चार भाऊ आणि बहिणींपेक्षा मोठी आहे. जेव्हा सेंट एन के जूनियर कॉलेजमध्ये ती बारावीचे शिक्षण घेत होती, तेव्हाच शिक्षण सोडून द्यावे, अशी परिस्थिती बनली. मात्र, कॉलेजमधील प्रोफेसर संगीता यांनी फातिमाची फी भरली अन् तिला पुढील शिक्षणासाठी मदत केली.

फातिमाने प्रथम तेलंगानातील एव्हिएशन अकॅडमीत सेसना स्काईवॉकवर गगनभरारी घेतली होती. सध्या ती एका टॉप एअरलाईनची ऑफिसर आहे. तसेच, एअरबस ३२० विमानही ती उडवत आहे. फातिमा आता ए ३८० फ्लीटसह उड्डाण घेण्यास तयार आहे.

जमिनीपासून ३०,००० फूट उंच उड्डाण केल्यानंतरही तिचे पाय जमिनीवर आहे. फातिमा म्हणते, मी एक पायलट बनू इच्छित होते, पण विमानाचे तिकीटही खरेदी करण्याची ऐपत माझी नव्हती. माझं पहिलं उड्डाण हे प्रवासी म्हणून नाही, तर कॉकपिटमध्ये बसून झालं होतं, असेही फातिमाने अभिमानाने सांगितलं.

फातिमाला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारने मोठी मदत केली. न्यूझिलंड आणि बहरीनमध्ये फॉरेन एव्हिएशन अकॅडमीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पायलट होण्याचे लायसन्ही मिळवले होते. त्यानंतर, आता ती एका टॉप एअरलाइनमध्ये नोकरी करत आहे.

फातिमाला असं वाटतं की, तिची मोठी मुलगी मरियम फातिमा शाकिब तिच्यासाठी एक आशीर्वाद आहे, कारण, तिच्या जन्मानंतच फातिमाला सरकारी स्कॉलरशिप मिळाली होती.