होम ग्राऊंडमध्ये भाजपाचं All is Well नाही; गुजरातमध्ये मोदी-शाहांची डोकेदुखी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:06 PM2024-04-02T22:06:30+5:302024-04-02T22:11:32+5:30

Loksabha Election 2024: आगामी लोकसभेसाठी गुजरातच्या २६ जागांवर भाजपाने उमेदवार घोषित केले. परंतु अंतर्गत नाराजी आणि विरोधामुळे २ उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर आली आहे. तरीही आणखी ३ जागांवर संघर्ष सुरू आहे.

गुजरात हा भाजपाचा गड मानला जातो. याच राज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येतात. त्यामुळे भाजपासाठी हे राज्य कायम सुरक्षित मानलं जातं. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं गुजरातमधील सर्व २६ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे तिसऱ्यांदा २०२४ मध्येही क्लीन स्वीप टार्गेट भाजपानं निश्चित केले आहे.

परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात भाजपामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपानं अंतर्गत विरोधातून याठिकाणी २ उमेदवार बदललेत. त्यानंतरही वाद शांत झाले नाहीत. ३ जागांवर अद्याप घमाशान सुरू आहे. त्यामुळे तिकीट कापण्याची टांगती तलवार कायम आहे.

विशेष म्हणजे गुजरात भाजपामध्ये पहिल्यांदाच असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यामुळे पक्षात काही ऑल इज वेल नाही हे पाहता मोदी-शाहांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. गुजरातमध्ये सर्व २६ जागांवर ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

भाजपानं इथं २६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये आप आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढत आहे. काँग्रेसनं २४ जागांवर तर आप पक्षाने २ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसकडे गुजरातमध्ये गमावण्याचं काही नाही. कारण मागील २ निवडणुकीत एकही खाते उघडले नाही.

त्याच भाजपातील अंतर्गत नाराजी पाहता यंदा काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आणि आप मिळून भाजपाला तिसऱ्यांदा क्लीन स्वीप मिळण्यापासून झटका देऊ शकतात त्यामुळे भाजपाचं टेन्शन वाढलं आहे. अंतर्गत विरोधामुळे या राज्यात भाजपानं २ उमेदवार बदलले आहेत.

साबरकांठा लोकसभा मतदारसंघातील भाजपानं भिखाजी ठाकोर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांच्या विरोधातील आक्रोश पाहता पक्षाने ठाकोर यांची उमेदवारी बदलून दुसऱ्यांना संधी दिली. काँग्रेसनं याठिकाणी भाजपातून आलेले माजी आमदार महेंद्रसिंह बरैया यांच्या पत्नी शोभना बरैया यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

भाजपानं वडोदरा जागेवर दोनदा खासदार राहिलेले रंजन बेन भट्ट यांना उमेदवारी दिल्यानं नाराजी पसरली. रंजन बेन भट्ट यांच्याविरोधात पोस्टर्सही झळकले. त्यामुळे पक्षाने येथील उमेदवारीही बदलली. रंजन बेन भट्ट यांनी निवडणूक लढण्यास नकार देताच हेमांग जोशी यांना रिंगणात उतरवण्यात आलं.

गुजरातच्या राजकीय मैदानात पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळालं आहे. भाजपानं घोषित केलेल्या लोकसभा उमेदवारांचा विरोध होतोय. आतापर्यंत हे कल्चर काँग्रेसमध्ये होते. ज्याठिकाणी तिकिटावर विरोध होत होता. भाजपामध्ये हायकमांडचा निर्णय सर्व स्वीकार करायचे परंतु गुजरातमध्ये भाजपात होणाऱ्या या विरोधामुळे वेगळेच चित्र समोर आले आहे.

राजकोटचे भाजपाचे उमेदवार पुरुषोत्तम रुपाला यांना विरोध होत आहे. रुपाला यांचा विरोध चिंतेचा विषय आहे, कारण राजकोट हा भाजपचा मजबूत बालेकिल्ला मानला जातो. नरेंद्र मोदी २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आयुष्यातील पहिली निवडणूक राजकोटमधून लढवली होती.

j