ॲव्हेंजर ते स्पायडरमॅन! हॉलिवूड सिनेमांना आवाज देणारे मराठमोळे डबिंग आर्टिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:37 AM2022-05-12T10:37:57+5:302022-05-12T10:40:38+5:30

Hindi dubbing artist:आजवर हॉलिवूड कलाकारांचे चाहते असलेले अनेक भारतीय पाहायला मिळतात. मात्र, असे काही भारतीय डबिंग आर्टिस्ट आहेत ज्यांनी हॉलिवूडपटांना त्यांचा आवाज दिलाय.

चित्रपटांमध्ये व्हिएफएक्सचा भरणा,प्रचंड मोठी स्टारकास्ट आणि दमदार कथानक यामुळे हॉलिवूड चित्रपट कायम चर्चेत असतात. त्यामुळे ते पाहणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. आजवर हॉलिवूड कलाकारांचे चाहते असलेले अनेक भारतीय पाहायला मिळतात. मात्र, असे काही भारतीय डबिंग आर्टिस्ट आहेत ज्यांनी हॉलिवूडपटांना त्यांचा आवाज दिलाय. त्यामुळेच हॉलिवूडच्या काही गाजलेल्या सिनेमांच्या हिंदी डबिंगला आवाज देणारे कलाकार कोणते ते पाहुयात.

राजेश खट्टर - राजेश खट्टर हे कलाविश्वातील मोठं नाव आहे. उत्तम अभिनेता असण्यासोबतच ते डबिंग आर्टिस्टदेखील आहे. त्यांनी आर्यन मॅन सीरिजच्या टोनी स्टार्क, पायरेट्स ऑफ कॅरेबियनच्या कॅप्टन जॅक स्पॅरो या कॅरेक्टरला आवाज दिला आहे. तसंच त्यांनी टॉम हँक्स, जॉनी डेप, ह्यूग जॅकमॅन, रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, द रॉक, निकोलस केजसारख्या अनेक कलाकारांसाठी हिंदी डबिंग केलं आहे.

मोहन कपूर - मोहन कपूरदेखील डबिंग आर्टिस्ट असण्यासोबत अभिनेता आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सहकलाकाराची भूमिका साकारली आहे. मोहन यांनी डाय हार्ड सीरिजमध्ये जॉन मॅक्लेन, द डार्क नाईट राइजमध्ये बॅन आणि डॉक्टर स्ट्रेंजमध्ये स्टीफन स्ट्रेंज यांच्यासाठी आवाज दिला आहे.

समय राज ठक्कर- समय हा एक मराठमोळा व्हॉइस ऑव्हर आर्टिस्ट आहे. त्याने बॅटमॅन सीरिजमध्ये ब्रूस वेनसाठी आवाज दिलाय. तसंच स्पायडरमॅन सीरिजमध्ये पीटर पार्कर, इटालियन जॉबमध्ये चार्लीसाठी आवाज दिला आहे. तसंच त्याने अॅव्हेंजरमध्ये हल्कसाठीही आपला आवाज दिला आहे.

संकेत म्हात्रे - आणखी एक मराठमोळा डबिंग आर्टिस्ट म्हणजे संकेत म्हात्रे. एक प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट असलेल्या संकेतने मार्वल लाइव-अॅक्शन मुव्हीमध्ये कॅप्टन अमेरिकासाठी आवाज दिला आहे.

विराज आढव - विराज आढवने हिंदी डब झालेल्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये खासकरुन टॉम क्रुझसाठी आवाज दिलेला आहे. मिशन इम्पॉसिबलच्या पहिल्या भागातही त्याने आवाज दिला असून मॅट्रिक्सच्या नियोसाठीही त्याने डबिंग केलं आहे.

निनाद कामत - एक हुशार आणि टॅलेंटेंड आर्टिस्ट म्हणून निनाद कामतकडे पाहिलं जातं. अभिनेता असण्यासोबतच व्हॉइस ऑव्हर आर्टिस्ट असलेल्या निनादने एव्हेंजर्सच्या सुपरव्हिलन थॅनोसला आवाज दिला आहे. त्याव्यतिरिक्त मॅन इन ब्लॅक सीरीजच्या दोन हिंदी डब चित्रपटांसाठी त्याने विल स्मिथलाही आवाज दिला आहे. तसंच ‘XXX’ मध्ये विन डिजल आणि स्टुअर्ट लिटिलमध्ये चॅंज पामिनटेरीसाठीही हिंदी डब केलं आहे.