Union Budget 2022: डिजिटल करन्सी म्हणजे काय रे भाऊ?; जाणून घ्या, RBI लॉन्च करणार डिजिटल रुपया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 01:30 PM2022-02-01T13:30:55+5:302022-02-01T13:36:51+5:30

Digital Currency in India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात डिजिटल करन्सी आणणार असल्याची घोषणा केली.

गेल्या अनेक दिवसांपासून भारतात डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु होत्या. क्रिप्टो करन्सी आल्यापासून यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली. परंतु भारतात याबाबत कुठलीही स्पष्टता नव्हती. परंतु आजच्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन(Niramala Sitharaman) यांनी याबाबत घोषणा केली आहे.

आगामी काळात भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल करन्सी आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. गेल्या काही वर्षात डिजिटल चलनाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिजिटल चलनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळेल असा विश्वास निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.

त्यामुळे आता क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून डिजिटल करन्सी येणार आहे. त्यामुळे भारतात व्यवहाराची पद्धत बदलेल. तुमच्याकडे असलेल्या रुपयाला पर्याय मिळणार आहे. परंतु तो छापील नोटांपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. पण तो रिझर्व्ह बँकच जारी करणार आहे.

सध्या जगभरातील सर्व बँका डिजिटल करन्सीवर काम करत आहेत. आता भारतात आरबीआय डिजिटल करन्सी आल्यानं खासगी क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्यापेक्षा सरकारी डिजिटल करन्सीत गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

पण खिशातील रुपयांपेक्षा हे चलन वेगळं असणार आहे. बिटकॉईनप्रमाणे यात गुंतवणूक करता येईल का? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. मात्र त्याआधी डिजिटल करन्सी नेमकं काय आहे? डिजिटल रुपया कसा वेगळा असेल याबाबत जाणून घेऊया

डिजिटल करन्सी म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असेल. ज्याप्रमाणे तुम्ही रोख पैसे देऊन व्यवहार करता तसेच तुम्ही डिजिटल चलन देऊन व्यवहार करु शकता. हे व्यवहार कुठल्याही मध्यस्थ अथवा बँकेशिवाय करता येतात. तुम्हाला रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल चलन देण्यात येईल.

तुम्ही डिजिटल पैसे ज्यांना द्याल किंवा ट्रान्सफर कराल ते त्यांच्यापर्यंत पोहचतील. पण हे पैसे तुमच्या वॉलेट अथवा बँकेच्या खात्यात असणार नाहीत. परंतु ज्याप्रकारे रोख व्यवहार होतात तसेच ते डिजिटल स्वरुपात करण्यात येतील. सध्या गरजेनुसार नोटा छपाई होते, त्या आरबीआयकडून बँकांकडे येतात आणि बँकांमार्फत त्या नोटा बाजारात येतात.

आता हा डिजिटल करन्सी म्हणजे डिजिटल पेमेंट आहे का? तर तसं नाही. हे खूप वेगळे आहे. बहुतेक डिजिटल पेमेंट चेकसारखे काम करतात. तुम्ही बँकेला सूचना केल्यानंतर बँक तुमच्या खात्यातून जमा रक्कमेचा व्यवहार करते.

परंतु तुम्ही डिजिटल चलन हे आभासी रुपात असणार आहे. तुम्ही पैसे दिल्यानंतर ते समोरच्याला पोहचले एवढेच त्याचे उद्दिष्ट आहे. म्हणजे आता डिजिटल पेमेंट होते ते तुमच्या बँकेतील खात्यातून पैसे हस्तांतरीत होतात. पण आता त्याची जागी डिजिटल करन्सी घेणार आहे.

मागील २-३ वर्षापासून भारतात डिजिटल करन्सीबद्दल बोललं जातं. आता भारतातही ही करन्सी येणार आहे. या करन्सीमुळे व्यवहार अधिक जलद होऊ शकतात. नोटांची छपाई खर्च कमी होईल. डिजिटल चलनासाठी बँकेत जायची गरज नाही. हे ऑफलाइनही असू शकतात.

डिजिटल रुपया किती आणि कधी जारी करायचं हे आरबीआय ठरवेल. या चलनावर सरकारचं लक्ष असेल. त्यामुळे डिजिटल रुपयाचा मागोवा घेणं शक्य आहे. केंद्र सरकारची ही घोषणा डिजिटल करन्सीच्या दिशेने मोठं पाऊल असल्याचं म्हटलं जातं.