भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर

By यदू जोशी | Published: June 14, 2024 08:51 AM2024-06-14T08:51:47+5:302024-06-14T08:52:42+5:30

BJP MLA Meeting : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे चिंतन-मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपच्या एकाच दिवशी चार बैठका शुक्रवारी मुंबईत होणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेतील केवळ मराठा आमदारांच्या बैठकीचाही त्यात समावेश आहे. 

lok sabha election 2024 Result: Meeting of Maratha MLAs of BJP today, the emphasis of brainstorming meetings throughout the day | भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर

भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर

- यदु जोशी
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे चिंतन-मंथन करण्यासाठी प्रदेश भाजपच्या एकाच दिवशी चार बैठका शुक्रवारी मुंबईत होणार आहेत. विधानसभा आणि विधान परिषदेतील केवळ मराठा आमदारांच्या बैठकीचाही त्यात समावेश आहे. 

मराठा समाजाच्या नाराजीचा भाजप व महायुतीच्या उमेदवारांना मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फटका बसला. आता असाच फटका विधानसभा निवडणुकीतही बसू नये यासाठी काय करता येईल या विषयी  मराठा आमदारांची मते उद्याच्या बैठकीत जाणून घेतली जातील. तसेच विधानसभेच्या दृष्टीने रणनीती ठरविली जाण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे मराठा आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर मराठा आमदारांमध्ये विश्वास वाढविण्याचे प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील करतील. 

२०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने राज्यातील ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप-शिंदेसेना-अजित पवार गटाने मिळून केवळ १७ जागा जिंकल्या. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ पक्षात काम करण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांनी दर्शविली, पण पक्षनेतृत्वाने त्यांना पदावर कायम राहण्यास सांगितले. महायुतीमध्ये पराभवानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे आव्हान समोर असताना भाजपच्या चार चिंतन बैठका शुक्रवारी होणार आहेत. 

असे आहे बैठकांचे नियोजन 
- लोकसभा निवडणुकीत भाजपची बूथ पातळीपर्यंत असलेली रचना परिणामकारकरीत्या काम करत नव्हती, अशा तक्रारी आहेत. या संदर्भात प्रदेश बूथस्तरीय कार्ययोजना समितीची बैठक दादरच्या मुंबई भाजप कार्यालयात सकाळी होईल.
- माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे या समितीचे संयोजक आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढलेले उमेदवार, कोअर कमिटी सदस्य, प्रदेश पदाधिकारी, प्रदेशातील केंद्रीय पदाधिकारी, राज्यसभा सदस्य, संघटन मंत्री, जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची एकत्रित जम्बो बैठक होईल. 
- दोन्ही बैठकांना उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील. त्यानंतर प्रदेश सरचिटणीस आणि संघटन मंत्र्यांची बैठक होईल. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी प्रदेश भाजपच्या कार्यालयात फक्त मराठा समाजाच्या आमदारांची बैठक होईल.

Web Title: lok sabha election 2024 Result: Meeting of Maratha MLAs of BJP today, the emphasis of brainstorming meetings throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.