80 हजारांवर फेक अकाऊंटवरून मुंबई पोलिसांची बदनामी; सुशांतप्रकरणी सायबर पोलिसांचा धक्कादायक दावा

By रूपाली मुधोळकर | Published: October 6, 2020 12:45 PM2020-10-06T12:45:27+5:302020-10-06T13:00:56+5:30

जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई- मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सुरु असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आलीये. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर हजारो बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून गेल्या तीन महिन्यांपासून राजकारण तापले आहे. यानिमित्ताने शिवसेनेला आणि मुंबई पोलिसांना लक्ष्य केले जातेय. या पार्श्वभूमीवर राजकारण ढवळून निघाले असताना सायबर पोलिसांनी हा खुलासा केला आहे.

फेसबुक, ट्वीटरवर हजारो फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. यात अत्यंत खालच्या थराला जाऊन पोस्ट करण्यात आल्या आहे, असे मुंबई सायबर पोलिसांनी म्हटले आहे.

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या सर्व अकाऊंटचा मुंबई सायबर सेल तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन गुन्हे दाखल केले आहे.

एक गुन्हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी करण्याबद्दल दाखल करण्यात आला. परमबीर सिंग यांचा फोटो मार्फ करून वापरण्यात आला होता. त्यांच्या फोटोवर असभ्य भाषेत टीका करण्यात आली होती.

दैनिक हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास 80 हजार फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या फेक अकाऊंटच्या माध्यमातून सुशांत सिंह राजपूतबद्दल अनेक पोस्ट करण्यात आल्या होता. यामध्ये #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR अशा हॅशटॅगचा वापर करून सरकारविरोधात मोहिम राबवण्यात आली होती.

मुंबई पोलिसांच्या सायबर युनिटच्या एका रिपोर्टनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इटली, जपान, फ्रान्स, थायलंड, इंडोनेशिया, पोलंड अशा जगातील अनेक देशांतून पोस्ट करण्यात आल्या होत्या. या पोस्टवर #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR अशा हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता.

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले की, या मोहिमेमुळे मुंबई पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झालेत. कोरोनाकाळात आम्ही आमचे 84 पोलिस कर्मचारी गमावले असताना आणि आमचे हजारो कर्मचारी कोरोना संक्रमित असताना ही मोहिम जाणीपूर्वक रचली गेली. मुंबई पोलिसांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न यातून केला गेला.

अलीकडे सुशांत सिंग प्रकरणी एम्सच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सोपवला आहे. सुशांतची हत्या झाली असावी, ही शक्यता या अहवालात फेटाळून लावली गेलीय. सुशांतची हत्या झाली नाही तर हे आत्महत्येचे प्रकरण आहे, असे या अहवालात म्हटले गेले आहे.

गत 14 जूनला सुशांतचा मृतदेह मुंबईतील त्याच्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता.

Read in English