भाजपाची दिल्लीत मॅरेथॉन बैठक, महाराष्ट्रातील जागावाटपावरही चर्चा; नव्या १० चेहऱ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:42 AM2024-03-08T09:42:35+5:302024-03-08T09:43:29+5:30

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली होती.

Loksabha Election 2024: BJP's marathon meeting in Delhi, seat sharing in Maharashtra also discussed; Opportunity for 10 new faces | भाजपाची दिल्लीत मॅरेथॉन बैठक, महाराष्ट्रातील जागावाटपावरही चर्चा; नव्या १० चेहऱ्यांना संधी

भाजपाची दिल्लीत मॅरेथॉन बैठक, महाराष्ट्रातील जागावाटपावरही चर्चा; नव्या १० चेहऱ्यांना संधी

नवी दिल्ली - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिल्लीत रात्री उशिरा मॅरेथॉन बैठक घेतली. सहा तास चाललेल्या या बैठकीत १५० लोकसभा जागांबाबत चर्चा करण्यात आली. या जागावाटपावर अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समितीने घेणार असून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी या आठवड्याच्या अखेरपर्यंत येऊ शकते. याआधी भाजपाने १९५ जागांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. 

भाजपाच्या ८ राज्यातील कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. त्यात हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थानसह इतर राज्यांचा समावेश होता. या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागावाटपावरही चर्चा झाली. यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून भाजपा ४८ पैकी ३२, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला १२ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी तिसऱ्यांदा नागपुरातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यादेखील लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच भाजपा लोकसभेच्या रिंगणात सुमारे १० नवीन चेहऱ्यांना संधी देईल असं सांगितले जात आहे. 

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. यावेळी शाहांनी शिंदे-पवारांना या लोकसभेत भाजपाला सांभाळून घ्या, त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेना-राष्ट्रवादीला पूर्ण पाठिंबा देऊ असं आश्वासन दिले आहे. राज्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीविरोधात काँग्रेस-शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. 

पुढील २ दिवसांत भाजपा १५० उमेदवारांच्या नावाची दुसरी यादी जाहीर करेल. निवडणूक तारखेच्या घोषणेआधीच भाजपा ३४५ उमेदवार घोषित करू शकते. ज्यामुळे निवडणूक प्रचाराला जास्तीत जास्त वेळ मिळण्याची शक्यता आहे. मात्र देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. लवकरच काँग्रेसही उमेदवारांची यादी जाहीर करेल. यात राहुल गांधी वायनाड, प्रियंका गांधी  उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून लढण्याची शक्यता आहे. रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सोनिया गांधी करत होत्या. परंतु त्यांना पक्षाने राज्यसभेवर पाठवल्याने ही जागा रिक्त झाली आहे. तर अमेठीबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. 

Web Title: Loksabha Election 2024: BJP's marathon meeting in Delhi, seat sharing in Maharashtra also discussed; Opportunity for 10 new faces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.