लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? मतदान कधी होणार?; समोर आली नवी तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:56 PM2024-03-05T13:56:51+5:302024-03-05T13:57:36+5:30

मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल, असे समजते.

Central Election Commission likely to take PC on March 14 to announce Lok Sabha election dates | लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? मतदान कधी होणार?; समोर आली नवी तारीख

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधी लागणार? मतदान कधी होणार?; समोर आली नवी तारीख

Lok Sabha Election ( Marathi News ) : देशात पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आपली सत्ता राखण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली असून दुसरीकडे विरोधकांची इंडिया आघाडीही यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आोयागाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात होती. अशातच याबाबत आता नवी तारीख समोर आली असून १४ मार्च रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा करू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल, असे समजते.

 जून २०२४ मध्ये १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरू  आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी निवडणूक तारखांची घोषणा होईल. सात टप्पांत होत असलेल्या मतदान प्रक्रियेची सुरुवात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात निवडणूक निकाल घोषित केला जाईल.

जागावाटपासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न

निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जागावाटपासाठी वेगवान प्रयत्न केले जात आहे. भाजपने आघाडी घेत आपल्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. दुसरीकडे, विरोधकांच्या आघाडीत यंदा नवीन पक्ष सामील झाल्याने जागावाटपासाठी उशीर होत असून याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या निवडणूक समितीची लवकरच बैठक होणार आहे. 

दरम्यान, भाजपने देशभरातील आपल्या १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी अद्याप महाराष्ट्रातील एकाही जागेवर उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष सोबत आल्याने जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम असून भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसीय महाराष्ट्रावर दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या या दौऱ्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Web Title: Central Election Commission likely to take PC on March 14 to announce Lok Sabha election dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.