'आम्ही जे बोललो, ते करुन दाखवलं', CAA लागू झाल्यानंतर अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 05:59 PM2024-03-12T17:59:52+5:302024-03-12T18:01:46+5:30

'मी तुम्हाला वचन देतो की, CAA मुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, त्यात नागरिकत्व घेण्याची कोणतीही तरतूद नाही.'

Amit shah CAA: 'What we said, we did', Amit Shah attacks Congress after CAA implementation | 'आम्ही जे बोललो, ते करुन दाखवलं', CAA लागू झाल्यानंतर अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

'आम्ही जे बोललो, ते करुन दाखवलं', CAA लागू झाल्यानंतर अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Amit shah CAA: केंद्रातील मोदी सरकारने काल(दि.12) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी केली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(amit shah) यांनी मंगळवारी CAA नियमांची अंमलबजावणी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, 'काँग्रेस पक्ष CAA विरोध करत होता. पण, आम्ही CAA कायदा लागू करू असे वचन दिले होते आणि आता वचन आम्ही पूर्ण केले आहे.' 

एका कार्यक्रमाला संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले, 'बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून अत्याचार झालेल्या निर्वासितांना आम्ही नागरिकत्व देऊ, असे वचन आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिले होते. काँग्रेस पक्ष सातत्याने तुष्टीकरण आणि मतांच्या राजकारणामुळे CAA कायद्याला विरोध करत आला आहे. लाखो पीडित लोक आपला धर्म वाचवण्यासाठी या देशात आले. त्यांना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मान करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. मी तुम्हाला वचन देतो की, CAA मुळे कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. CAA हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, त्यात नागरिकत्व घेण्याची कोणतीही तरतूद नाही.' 

शाह पुढे म्हणाले, 'आम्ही दुसरे वचन दिले होते, ते म्हणजे काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे. 70 वर्षांपासून काँग्रेस वाले कलम 370 वरुन राजकारण करत होते. पण पंतप्रधान मोदींनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले आणि राज्यात शांतता प्रस्थापित केली. आम्ही तिहेरी तलाक रद्द करू, असे आश्वासन दिले होते. ते आश्वासनही आम्ही पूर्ण केले. काँग्रेसने कधीच मुस्लिम महिलांची काळजी घेतली नाही.' 

'रामलला 500 वर्षे अपमानित अवस्थेत होते, काँग्रेसने रामललाला 70 वर्षे तंबूत राहण्यास भाग पाडले.काँग्रेस पक्ष 70 वर्षांपासून राम मंदिराचा मुद्दा जैसे ते ठेवला. काँग्रेसने तर मंदिर बांधलेच नाही, उलट राम मंदिराच्या उद्घाटनाकडे पाठ फिरवली. व्होट बँकेच्या लालसेपोटी त्यांनी राम मंदिराच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. पंतप्रधान मोदींनी 22 जानेवारी 2024 रोजी रामललाला मान मिळवून दिला. मोदींनी देशाला राजकीय स्थैर्य देण्याचे काम केले आहे. आया राम, गया रामचे राजकारण संपवत 10 वर्षे पूर्ण बहुमताने सरकार चालवले. या 10 वर्षात मोदींनी भ्रष्टाचारमुक्त कारभार दिला आहे. मी 23 वर्षांपासून पाहतोय, मोदीजींनी एकही रजा घेतली नाही. 23 वर्षे गरिबांच्या कल्याणासाठी सतत काम करत आहे,' असंही शाह यावेळी म्हणाले.
 

Web Title: Amit shah CAA: 'What we said, we did', Amit Shah attacks Congress after CAA implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.