Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:33 IST2026-01-09T12:31:52+5:302026-01-09T12:33:07+5:30
Nashik Municipal Election 2026 : आजपासून पुढचे तीन दिवस शहरात मुख्य नेत्यांच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
नाशिक : आजपासून पुढचे तीन दिवस शहरात मुख्य नेत्यांच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका, मंत्री पंकजा मुंडे यांची रॅली नाशिकच्या राजकीय आखाड्यात पहायला मिळणार असल्याने मतदानापूर्वीच्या या सात दिवसात निवडणुकीसाठीची रंगत अधिकच वाढेल. उद्धव अन् राज हे दोघे बंधू २३ वर्षानंतर शहरात एकाच व्यासपीठावर येणार असल्याने ते मतदारांना कितपत आकर्षित करतात? याचे उत्तर सभेत मिळेल.
शिंदेसेनेतील उमेदवारांच्या प्रचारार्थ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा शनिवारी (दि.१०) सायंकाळी सहा वाजता अनंत कान्हेरे मैदानावर होत असल्याची माहिती माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सभेला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, प्रवक्त्या ज्योती वाघमारे हेदेखील संवाद साधतील.
त्याअगोदर आज (दि.९) उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोघे बंधू याच पटांगणावर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सभा घेत आहे. ठाकरे बंधू आज काय बोलणार अन् त्यांना उद्याच्या सभेत एकनाथ शिंदे काय उत्तर देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तर शिंदे अन् ठाकरे यांचे मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसे खोडून काढणार? याविषयी देखील उत्सुकता वाढणार आहे. कारण फडणवीस यांची सभा रविवारी (दि.११) होत आहे.
नाशिकमध्ये तिघेही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत असल्याने नेते एकमेकांना कसे उत्तर देणार याविषयी जोरदार चर्चा आहे. राज्यात महायुतीचे सरकार एकत्रित कारभार पाहत असले तरी नाशिकमध्ये मात्र भाजपा अन् शिंदेसेना एकमेकांच्या विरोधात ठाकले असल्याने निवडणुकीत प्रचंड रंगत आली आहे. मुख्यमंत्र्यांनी मागच्या काळात नाशिककरांना दिलेल्या आश्वासनाची आठवण ठाकरे बंधू व उपमुख्यमंत्री करून देणार असल्याची चर्चा आहे.
तपोवनाससह फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
ठाकरे बंधूंच्या सभेत तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा निघणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी दोन आठवड्यापूर्वी केलेल्या नाशिकच्या दौन्यात तपोवनाचा मुद्दा मतदारांकडे प्रभावीपणे मांडा, अशी सूचना स्थानिक नेत्यांना केली होती. त्यामुळे आजच्या सभेत ठाकरे बंधू याच मुद्द्यावरून भाजपाला घेरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर उद्धव सेनेतील दोन माजी महापौरांनी भाजपात प्रवेश केला होता. तर मागच्या दोन वर्षात उद्धवसेना व मनसेतील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. या फोडाफोडीवरून देखील ठाकरे बंधू भाजपासह शिंदेसेनेचा समाचार घेऊ शकतात.