मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:16 IST2025-12-27T10:16:06+5:302025-12-27T10:16:41+5:30
Nashik Municipal Corporation Election And BJP : महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे महायुतीची चर्चा काहीशी संथ असताना त्याला पर्याय म्हणून शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचीच जवळीक वाढली आहे. अशातच या मित्रपक्षातील तीन माजी नगरसेवकांना भाजपने गळाला लावल्याची चर्चा आहे.

मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी एकीकडे महायुतीची चर्चा काहीशी संथ असताना त्याला पर्याय म्हणून शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचीच जवळीक वाढली आहे. अशातच या मित्रपक्षातील तीन माजी नगरसेवकांना भाजपने गळाला लावल्याची चर्चा आहे. कदाचित युती न झाल्यास संबंधित तिघेजण भाजपत येऊ शकतील असे सूत्रांनी सांगितले. तथापि, भाजप आता मित्रपक्षाला धक्का देण्याचे काम करीत असल्याचे चित्र असून, त्यामुळे या पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
नाशिक महापालिकेच्या निवडणूका एकत्रितपणे लढवण्याची भाषा करणाऱ्या भाजपाने आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली खरी मात्र, नंतर ठोस निर्णयासाठी बैठकच झाली नाही. भाजप ८२ जागांवर ठाम असल्याने आधी गिरीश महाजन यांनी सांगितले त्यानंतर चर्चा तर केली नाहीच उलट उद्धवसेना, काँग्रेस, मनसेमधील अनेकांना भाजपत घेतल्याने आता त्यांच्याकडे ९०हून अधिक सक्षम उमेदवार तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपशी चर्चेत शिंदे सेनेने ४५ जागा मागितल्या असून, राष्ट्रवादीने (अजित पवार) ३५ जागा मागितल्या आहेत. त्यावर भाजपाकडून कोणताही प्रतिसाद नाही. त्यामुळे आता शिंदे सेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या युतीच्या बैठकींना वेग आला असताना आता भाजपाकडून आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
महायुतीतील मित्रपक्षाच्या तीन माजी नगरसेवकांना भाजप आपल्य पक्षात घेण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त आहे. यात एक माजी नगरसेविकादेखील असून, त्यांच्याशी वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भाजप आत मित्रपक्षांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीच्या चर्चा झाल्या असल्या तरी अद्याप कोणताही निर्णय नाही. किंबहूना भाजप युतीच्या मानसिकेतत तयारीत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे महायुतीतच उमेदवारांची पळवापळवी सुरू झाल्यास मैत्रिपेक्षा राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे.
भाजपचा ज्या भागात प्रभाव आहे तेथेही भाजपने मुळातच अन्य पक्षांचे सक्षम उमेदवार घेतले आहेत. आता ज्या ठिकाणी मित्रपक्षातील काही उमेदवार सक्षम आहेत, त्यांच्यापैकी काही सक्षम माजी नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहे.