नाशिक जागेवरुन महायुतीमध्ये सस्पेन्स वाढला! भाजपा नेत्याने बावनकुळेंना लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 17:01 IST2024-04-22T16:56:09+5:302024-04-22T17:01:03+5:30
भाजपा नेते दिनकर पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले आहे.

नाशिक जागेवरुन महायुतीमध्ये सस्पेन्स वाढला! भाजपा नेत्याने बावनकुळेंना लिहिले पत्र
महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन तिढा वाढल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू होती. आता या मतदारसंघात उमेदवारीवरुन तिढा वाढला आहे. भाजपा नेते दिनकर पाटील यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिले आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
"नाशिक लोकसभेची जागा भाजपाला सुटावी अशी वारंवार मागणी आम्ही केली आहे. भाजपाला ही जागा सुटल्याशिवाय महायुतीची जागा निवडणून येणार नाही. हेमंत गोडसे यांच्याबाबत लोकांच्यात नाराजी आहे, त्यांनी दहा वर्षात काहीच काम केलेले नाही. त्यामुळे हेमंत गोडसे यांना उमेदवारी देऊ नये,असंही दिनकर पाटील म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत भाजपनं उघडलं विजयाचं खातं; इतर सर्व उमेदवारांची माघार अन्...
"मी गेल्या दोन वर्षापासून भाजपाचा इच्छुक उमेदवार म्हणून काम करत आहे. छगन भउजबळ साहेब हुशार आहेत, हेमंत गोडसे यांनी स्वत:हून उमेदवारी मागे घेतली पाहिजे, असंही दिनकर पाटील म्हणाले.
नाशिकमध्ये पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान हाेणार असले तरी आता प्रचारासाठी महिनाही उरलेला नाही. दोन आठवड्यांपूर्वी भुजबळ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर भाजप आणि शिंदेसेना आक्रमक झाली होती. या पक्षाच्या नेत्यांच्या मुंबई आणि दिल्लीत चकरा वाढल्या होत्या. तिढा सुटत नसल्याने आणि भुजबळ यांच्या नावावरूनच बरा-वाईट खल सुरू झाल्याने त्यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. मात्र, त्यानंतरही उमेदवारी घोषित झालेली नाही. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादीही ठाम
छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर आता अजित पवार गटाकडून निवृत्ती अरिंगळे आणि आमदार माणिकराव कोकाटे यांचीही निवडणूक लढण्याची तयारी सुरू झाली आहे. भुजबळ नसले तरी ही जागा अजित पवार गटालाच द्यावी, अशी मागणी होत आहे.