बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
By नरेश डोंगरे | Updated: November 4, 2025 20:35 IST2025-11-04T19:43:54+5:302025-11-04T20:35:14+5:30
मालगाडीवर पॅसेंजर आदळली : १० जणांचा मृत्यू, दोन डझनावर प्रवासी जखमी : जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला

10 people died in a terrible train accident near Bilaspur! The screams of the injured shook the area; How many passengers were from Maharashtra?
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रायगडहून वेगात येणारी रेल्वे पॅसेंजर मालगाडीवर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जाते. मृतांमध्ये महिला आणि लहान मुले यांचा समावेश अधिक असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास बिलासपूर (छत्तीसगड)जवळ लाल खदान परिसरात हा भयावह अपघात घडला. अपघात इतका भीषण आहे की मालगाडीला धडकल्यानंतर कोरबा-पॅसेंजर ट्रेनचे अनेक डबे पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले. अनेक डबे रुळाखाली उतरले. अपघातानंतर ट्रेनमधील हादरलेल्या प्रवाशांनी एकच कल्लोळ केला. नातेवाईक तसेच सोबतच्या प्रवाशांना झालेल्या गंभीर जखमा बघून अनेकजण थरारले. दरम्यान, माहिती कळताच बिलासपूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, बिलासपूर झोनचे रेल्वेचे शिर्षस्थ अधिकारी, आरपीएफ, जीआरपीचा ताफा आणि मोठ्या संख्येतील रेल्वेचे कर्मचारी बचाव कार्यासाठी घटनास्थळी धावले. तोपर्यंत प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.
मृत आणि जखमींचा आकडा
अपघातानंतर डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरच्या साहाय्याने डबे फोडण्याचे काम सुरू आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अंधार पडल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असल्याचे संबंधितांनी सांगितले. लोको पायलट केबिनमध्येच अडकलेले असून मृत आणि जखमींची अचूक संख्या जाहीर करणे तूर्त शक्य नसल्याचे रेल्वे अधिकारी म्हणाले.
महाराष्ट्रातील प्रवाशांचा समावेश ?
अपघात छत्तीसगडमध्ये झाला असला तरी या ट्रेनमध्ये विदर्भ, महाराष्ट्रातील प्रवासीही मोठ्या संख्येत असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासंबंधाने अधिकृत माहिती वृत्तलिहिस्तोवर मिळाली नाही. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले.
बिलासपूर–कटनी रेल्वे मार्ग ठप्प
या अपघातानंतर बिलासपूर–कटनी रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे काही एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या नागपूर मार्गे वळविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
रेल्वेची हेल्पलाइन
या अपघातानंतर रेल्वेने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन नंबर जारी केले. त्यानुसार, 7777857335 (बिलासपूर स्टेशन), 8294730162 (पेंड्रा रोड) तसेच दुर्घटनास्थळी तात्काळ मदतीसाठी 9752485499 आणि 8602007202 हे दोन विशेष क्रमांक उपलब्ध आहेत.