mulgi zali ho actor kiran mane facebook post viral on social media | हे लोक तुमच्यापुढं आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय ठेवत नाहीत...! किरण मानेची पोस्ट चर्चेत

हे लोक तुमच्यापुढं आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय ठेवत नाहीत...! किरण मानेची पोस्ट चर्चेत

ठळक मुद्देकिरणच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम करतोय. यात तो विकास पाटील ही व्यक्तिरेखा साकारतोय.

जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती... उसकी बदनामी शुरु की जाती है... ! होय, रोखटोक बोलणारा, टीकाकारांना शिंगावर घेणारा मराठमोळा अभिनेता किरण माने (Kiran Mane) याने अशी सुरुवात करत, एक जळजळीत पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या पोस्टमध्ये किरणने मराठी कलाविश्वातील  (Marathi Film Industry) एका विशिष्ट गटावर निशाणा साधला आहे.
‘ अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही जीव ओतून प्रामाणिकपणे चांगलं काम करा... रोज ‘मरण’ अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आत्महत्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत’, अशी पोस्ट किरणने शेअर केली आहे.

मराठी मनोरंजनविश्वात करिअर करणा-यांना त्याने एक सल्लाही दिला आहे. ‘या क्षेत्रात लाईफलाँग करिअर करू इच्छिणा-या सर्वसामान्य वर्गातील कलाकारांनो... कळकळीची विनंती आहे... एकतर पूर्ण तयारीनिशी... संपूर्ण ताकदीनं या किंवा येऊ नका,’ असे त्याने लिहिले आहे.
किरणच्या कामाबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत काम करतोय. यात तो विकास पाटील ही व्यक्तिरेखा साकारतोय.
 
वाचा, किरण मानेची पोस्ट त्याच्याच शब्दांत...

जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती...

उसकी बदनामी शुरू की जाती है !

...मराठी कलाप्रांताचा गळा ठरावीक बुरसटलेल्या विचारधारेच्या गटानं आपल्या जबरदस्त पकडीत दाबून धरलाय दोस्तांनो ! तुम्हाला माहितीय, किरण माने हवेतल्या गोष्टी बोलत नाही. तुकारामाची पताका हातात घेतलेल्या वारकर्‍याच्या रक्तात "अनुभवावाचून सोंग संपादणे" कदापी येणार नाही ! तुम्ही प्रतिभावान असाल-मेहनती असाल-आपलं काम खणखणीत वाजवत असाल... पण तुम्ही त्यांच्या 'गटात' न बसणारे - त्यांची विचारधारा न मानणारे असाल तर तुम्हाला मराठीत भयानक आणि जीवघेण्या संघर्षातून पुढे जाण्याशिवाय तरणोपाय नाही !! हो, तुम्ही कलावंत म्हणून सुमार दर्जाचे असाल, तर मात्र तुम्ही 'सुरक्षित' आहात. त्यांना शेजारी उभी करायला अशी बुजगावणी लागतातच.

पण अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही कित्त्तीही जीव ओतून - प्रामाणिकपणे चांगलं काम करा... रोज 'मरण' अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आत्महत्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत.

आपला तुकोबाराया या छळाबाबत बोलून गेलाय:

"रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग... अंतर्बाह्य जग आणि मन !

जिवाहि आगोज पडती आघात... येऊनिया नित्य नित्य वारि !!

तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे... अवघियांचे काळे केले तोंड !!!"

...'ते' आधी तुम्हाला दुर्लक्षित करतात...

नंतर तुम्हाला 'डावलणं' सुरू होतं...

त्यानंतर तुम्हाला अपमानीत केलं जातं...

... तरीही तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहून नाणं वाजवत राहीलात तर तुमची खोटी 'बदनामी' हा हुकमी एक्का काढला जातो...

त्यानंतरही तुम्ही जिद्दीनं, चिवटपणे, न थकता आपला झेंडा रोवत 'अवघियांचे तोंड काळे' करत राहिलात, तरच तुम्ही टिकू शकता ! या क्षेत्रात 'लाईफलाॅंग करीयर' करू इच्छिणार्‍या सर्वसामान्य 'वर्गातील' कलाकारांनो... कळकळीची विनंती आहे... एकतर 'पूSSSर्ण' तयारीनिशी... संपूर्ण ताकदीनं या किंवा येऊ नका.

- किरण माने.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mulgi zali ho actor kiran mane facebook post viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.