चंद्राला टक्कर देण्यासाठी येतीये दमयंती; 'चंद्रमुखी'मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 02:31 PM2022-04-21T14:31:28+5:302022-04-21T14:32:56+5:30

Chandramukhi : आतापर्यंत 'चंद्रमुखी' या चित्रपटात केवळ चंद्रा आणि दैलतराव देशमाने यांची प्रेमकथा पाहायला मिळणार असंच प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र, प्रत्यक्षात या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे.

marathi upcoming movie Chandramukhi actress Mrunmayee Deshpande play damayanti role | चंद्राला टक्कर देण्यासाठी येतीये दमयंती; 'चंद्रमुखी'मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

चंद्राला टक्कर देण्यासाठी येतीये दमयंती; 'चंद्रमुखी'मध्ये मृण्मयी देशपांडे साकारणार 'ही' महत्त्वपूर्ण भूमिका

googlenewsNext

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याने चंद्रमुखी या आगामी चित्रपटाची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर केवळ आणि केवळ चंद्रा या एकाच व्यक्तीरेखेची चर्चा रंगली आहे. आपल्या मोहमयी रुपाने, अदांनी आणि नृत्यकौशल्यांना अनेकांना प्रेमात पाडणाऱ्या या चंद्राची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. मात्र, याच चित्रपटात तिला टक्कर देण्यासाठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची एन्ट्री झाली आहे.

 आतापर्यंत 'चंद्रमुखी' या चित्रपटात केवळ चंद्रा आणि दैलतराव देशमाने यांची प्रेमकथा पाहायला मिळणार असंच प्रेक्षकांना वाटत होतं. मात्र, प्रत्यक्षात या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे.  या चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची एन्ट्री होणार असून ती अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.
नुकताच चंद्रमुखीचा  ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये चंद्रासह आणखी एक व्यक्तीरेखा प्रेक्षकांसमोर आली ती म्हणजे दमयंतीची. या चित्रपटात मृण्मयी, दमयंती ही भूमिका साकार आहे. विशेष म्हणजे ही दमयंती दुसरी तिसरी कोणी नसून दौलतराव देशमाने यांची पत्नी आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळणार आहे.

''ही कथा अतिशय ताकदीची आहे. ज्यावेळी हा चित्रपट मी करण्याचे ठरवले तेव्हाच माझ्या डोक्यात या व्यक्तिरेखा कोण साकारणार हे पक्के होते. त्यामुळे प्रत्येक पात्र आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट खूप विचार करून करण्यात आली आहे आणि त्याची भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर दिसेलच. चित्रपटातील दमयंती ही व्यक्तिरेखा इतक्या दिवसांनी प्रेक्षकांसमोर आणण्यामागेही काही विचार होता. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या चित्रपटासाठी सर्वच कलाकारांनी मेहनत घेतली आहे", असं दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "अमृता, मृण्मयी आदिनाथबद्दल मला आवर्जून सांगावेसे वाटते. अमृताने ही भूमिका साकारण्यासाठी वजन वाढवले आणि तेच वजन चित्रपटाकरता कायम ठेवण्यासाठीही तिने खूप मेहनत घेतली आहे. भाषेवर अभ्यास केला आहे. शिवाय अनेक काळ ती सोशल मीडियापासूनही लांब राहिली. तर आदिनाथनेही त्याची देहबोली, ध्येयधुरंदर, रुबाबदार दिसण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. मृण्मयीची भूमिकाही खूप महत्वपूर्ण आहे." 

 ''यात मी खासदार दौलतराव देशमाने यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. डॉली म्हणजेच दमयंती दौलतराव देशमाने. जिचा दौलतरावांची कारकीर्द घडवण्यात मोठा सहभाग आहे. ट्रेलरपर्यंत आम्हाला ही व्यक्तिरेखा समोर येऊ द्यायची नव्हती याचे कारण म्हणजे कथानकात पुढे काय गोष्ट बदलते, यावर पडदा ठेवायचा होता. एक एक व्यक्तिरेखा समोर येत होत्या तशा त्या प्रेक्षकांच्या डोक्यात बसत होत्या आणि अचानक माझी व्यक्तिरेखा समोर आल्यावर सगळी समीकरणे बदलली. मात्र चित्रपटात उलट आहे. 'चंद्रमुखी'च्या येण्याने सगळी समीकरणे बदलतात. प्रमोशन आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.  मला एक आवर्जून सांगावेसे वाटते, याची पटकथा चिन्मयने लिहिली आहे आणि आतापर्यंतची चिन्मयची ही सर्वोत्तम कलाकृती आहे. ही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची खुबी प्रसादकडे आहे. त्यानेही उत्तमरित्या ही कथा समोर आणली आहे,''  असं मृण्मयी तिच्या भूमिकेविषय़ी म्हणाली.

दरम्यान, 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक प्रसाद ओक आणि लेखक चिन्मय मांडलेकर यांची जबरदस्त जोडी 'चंद्रमुखी' सारख्या भव्यदिव्य चित्रपटाच्या निमित्ताने हॅट्रिक करत आहे.  'चंद्रमुखी' या चित्रपटाची पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे यांच्यासोबतच मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राधा सागर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 

Web Title: marathi upcoming movie Chandramukhi actress Mrunmayee Deshpande play damayanti role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.