'प्रेमासाठी वाट्टेल ते' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का?, असा झाला होता तिचा दुर्देवी शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:00 AM2021-08-03T06:00:00+5:302021-08-03T06:00:00+5:30

या अभिनेत्रीने मराठीसोबतच हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

Do you remember the actress in the movie 'Premasathi Vattel Te'? That was her unfortunate end | 'प्रेमासाठी वाट्टेल ते' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का?, असा झाला होता तिचा दुर्देवी शेवट

'प्रेमासाठी वाट्टेल ते' चित्रपटातील ही अभिनेत्री आठवतेय का?, असा झाला होता तिचा दुर्देवी शेवट

googlenewsNext

सत्तरच्या देशातील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे करिअर फार काळ नव्हते. मात्र त्यांनी जेवढे चित्रपटात काम केले तेव्हा ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. फक्त रुपेरी पडदाच नाही तर रंगभूमीवरदेखील प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. 

पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूर येथे ७ जुलै १९४४ रोजी झाला. लहानपणापासूनच पद्मा यांना अभिनय व नृत्याची आवड होती. त्यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेऊन शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांना चंदेरी दुनियेची ओढ लागली होती. त्यांचे वडील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांनी आपल्या लेकीला कधीच विरोध नाही केला.


भाव बदलणारा सुरेख चेहरा, बोलके डोळे तसेच अभिनेत्रीला आवश्यक असणारे आकर्षक व्यक्तिमत्त्व त्यांच्याकडे जन्मजातच होते जणू. म्हणूनच की काय त्यांना पडद्यावर झळकण्यासाठी जास्त वेळ स्ट्रगल करावा लागला नाही. १९५९ साली वयाच्या १५व्या वर्षीच भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा चित्रपटात पद्मा यांना काम मिळाले आणि त्यांनी सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले.


चित्रपटांसोबतच रंगभूमीवरही त्यांचे आगमन झाले. त्यांचा अभिनय शहरी व ग्रामीण कथानकानाही पूरक होता. दिलखेचक व बिनधास्त अभिनय आणि अप्रतिम सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्या अभिनयामुळे ‘महाराष्ट्राची मर्लिन मनरो’ व ‘सौंदर्याचा अँटम बॉम्ब’ हे किताब आचार्य अत्रे यांनी त्यांना बहाल केले होते. गुंतता हृदय हे या नाटकातील कल्याणी, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल या नाटकातील सुनीता, माझी बायको माझी मेव्हणी मधील रसिका, लग्नाची बेदी मधील रश्मी अशा त्यांच्या बऱ्याच भूमिका लोकप्रिय ठरल्या. या भूमिकांमुळे प्रेक्षकांनी त्यांची नाटके अक्षरशः डोक्यावर घेतली.
अभिनयाची घोडदौड सुरू असताना दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्यासोबत १९६६ साली पद्मा यांचे लग्न झाले. पद्मा यांनी आकाशगंगा, अवघाची संसार, जोतीबाचा नवस, संगत जडली तुझी न माझी, बोट लावीन तिथे गुदगुल्या, लाखात अशी देखणी सारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले. सुमारे २८ मराठी चित्रपटात त्यांनी काम केले.


मराठी सिनेइंडस्ट्रीसोबतच पद्मा यांनी हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. बऱ्याच निगेटिव्ह भूमिका केल्या. १९६८ साली आदमी या चित्रपटात त्यांनी अशोक कुमार, मनोजकुमार, वहिदा रहमान यांच्यासोबत काम केले. १९६३ साली रिलीज झालेला चित्रपट बिन बादल बरसात तर कश्मीर की कलीमध्ये त्यांनी शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासोबत त्या झळकल्या. १९७५ साली या सुखांनो या आणि १९७६ साली आराम हराम है या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. या काळात त्या आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीच्या यशाच्या शिखरावर होत्या. १२ सप्टेंबर, १९९६ साली एका मोटार अपघातात  अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे दुर्देवी निधन झाले.

Web Title: Do you remember the actress in the movie 'Premasathi Vattel Te'? That was her unfortunate end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.