corona virus actor kiran mane apologies to maharashtra cm uddhav thackarey-ram | सॉरी उद्धवजी! मला तुमची माफी मागायचीय...!! अभिनेत्याने मागितली मुख्यमंत्र्याची माफी

सॉरी उद्धवजी! मला तुमची माफी मागायचीय...!! अभिनेत्याने मागितली मुख्यमंत्र्याची माफी

ठळक मुद्देही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोनाने जगातच नाही तर देशातही हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 600 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने तमाम मराठी माणसांच्या चिंता वाढल्या आहेत. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अगदी खंबीरपणे स्थिती हाताळत आहेत. मुख्यमंत्री ज्या पद्धतीने हे संकट हाताळत आहेत, ते पाहून आता त्यांच्या टीकाकारांनीही त्यांचे कौतुक करायला सुरूवात केली आहे. होय, अभिनेते किरण माने यांनी तर फेसबुकवर जाहीर पोस्ट लिहून उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे.


ही माफी कशासाठी तर याआधी त्यांच्यावर टीका केल्याबद्दल. होय, उद्धव ठाकरे पूर्वीच्या सरकारमध्ये असताना किरण माने यांनी त्यांच्यावर अनेकदा तोंडसुख घेतले. पण आता याच किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने  या संकटाच्या काळात त्यांनी दाखवलेली तत्परता पाहून किरण माने यांनी भारावले आहेत आणि आता चक्क त्यांनी माफीनामा लिहिला आहे.
 सॉरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय, अशा आशयाची त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर सध्या कमेंटचा अक्षरश: पाऊस पडताना दिसत आहे. ज्यात सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करताना दिसत आहेत.

 

किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले..

साॅरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय.
तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो... भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून 'शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला' असं मला वाटायचं. आज तुम्ही मला खोटं ठरवलंत.

खूप कमी माणसं अशी असतात, जी तुम्हाला चकीत करून टाकतात ! आधी तुमच्या मनात इमेज डागाळलेली असते... अशा काही घटना घडतात की तोच माणूस विजेसारखा लखलखून तुमचे डोळे दिपवून टाकतो !

ऊद्धवजी तुम्ही आज आम्हाला दिपवून टाकताय. आज अत्यंत कठीण परीस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारं एकमेव कोण असेल तर ते तुम्ही आहात. खालच्या पट्टीत अत्यंत शांत संयमी बोलणं.. मुद्देसूद-थेट बोलणं..सद्यपरीस्थितीबद्दल सतत 'फॅक्च्यूअल डेटा' देणं.. बोलताना 'अनावश्यक पाल्हाळ' आणि 'डायलाॅगबाजी' टाळणं... खरंच चकीत होतोय रोज !

'लाॅकडाऊन'चा निर्णय खूप आधी आणि योग्य वेळेत घेतला होतात तुम्ही... तो ही थेट प्रशासनामार्फत नोटीस देऊन. लगोलग. 'टीझर-प्रोमो-अॅड-मार्केटिंग आणि मग पिच्चर' अशा फिल्मी गोष्टींत तुम्ही वेळ घालवत बसत नाही. खटक्यावर बोट जागेवर पलटी.. मानलं तुम्हाला !

कालच 'मास्क'स् चा खूप मोठा, जवळजवळ दोन कोटी रूपये किमतीचा बेकायदा साठा पोलीसांनी पकडणं - विनाकारण बाहेर फिरणार्‍यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन घरी पाठवणं - माझं घर सातार्‍यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. शांत एरीया. तिथपर्यन्तसुद्धा रोज रात्रंदिवस पोलीसांनी गस्त घालणं.. इतकी 'एफिशियन्सी' आम्ही आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. संपूर्ण प्रशासन हललंय. खूप आधार वाटतोय. कठीण काळात तुमच्यासारखं अत्यंत प्रगल्भ नेतृत्त्व लाभणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे ! या काळातलं तुमचं काम सुवर्णाक्षरांनी लिहीलं जाणार आहे. पुढच्या पिढ्या तुम्हाला सलाम करणारेत !!!

धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे...मन:पूर्वक धन्यवाद !

- किरण माने.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: corona virus actor kiran mane apologies to maharashtra cm uddhav thackarey-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.