HBD Ashok Saraf: अशोक सराफ नावाचा जादूगार कलाकार अन् सगळ्यांचा लाडका मामा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 03:51 PM2020-06-04T15:51:27+5:302020-06-04T15:59:50+5:30

जेव्हा जेव्हा अशोकमामांना भेटायला मी त्यांच्या घरी जातो तेव्हा ‘‘काय मग टिळेकर" असं हसतमुख चेहऱ्याने स्वागत करणारे अशोक मामा मनसोक्त गप्पा मारतात.

Ashok Saraf Birthday: Magician artist of film and theatre industry | HBD Ashok Saraf: अशोक सराफ नावाचा जादूगार कलाकार अन् सगळ्यांचा लाडका मामा!

HBD Ashok Saraf: अशोक सराफ नावाचा जादूगार कलाकार अन् सगळ्यांचा लाडका मामा!

googlenewsNext

>> महेश टिळेकर, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक

वडीलधाऱ्या मंडळींचे बोट धरत हळूहळू पावले टाकत चालायला शिकणाऱ्या लहान मुलासारखं अशोक सराफ या ’बाप’अभिनेत्याचे चित्रपट पाहत गेली अनेक दशके अनेक कलाकार घडले आहेत, समृद्ध झाले आहेत. लहानपणापासून अशोक सराफ यांचे चित्रपट टीव्हीवर थिएटरमध्ये पाहताना अशोक सराफ नावाचा नट हा एक ’जादूगार’ आहे अशी माझी पक्की खात्री झाली.

विनोदी भूमिकेत त्यांना पाहताना दिलखुलास आपण हसत राहतो. गंभीर भूमिका पाहून आपणही हळहळतो, त्यांनी साकारलेला खलनायक पाहून तिरस्कारही वाटू लागतो. जादूगार जसं त्याच्या पोतडीतून एक-एक वस्तू काढत समोरच्याला खिळवून ठेवतो अगदी तसंच चित्रपटांमधील अशोक सराफ यांची विविध रूपे, भूमिका प्रेक्षकांना भुरळ पाडतात.

मी सिनेमाक्षेत्रातच काम करायचं म्हणून धडपड, स्ट्रगल करीत असताना अभिनेत्री उषा चव्हाण यांनी त्यांच्या निर्मिती दिग्दर्शन असलेल्या ’गौराचा नवरा’ ह्या चित्रपटात एका कोळी गाण्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मागे मॉब आर्टिस्ट म्हणून उभं राहायची संधी मला दिली. 1992 मध्ये त्यांच्या दुसऱ्या सिनेमाची तयारी सुरू झाल्यावर मला दिग्दर्शन शिकायचं आहे असं सांगितल्यावर, "ते नंतर बघू, आधी पडेल ते काम करायला लागेल", असं मला उत्तर मिळालं. आपल्याला शुटिंग कसं चालतं ते जवळून पाहता येईल त्यातूनही काही शिकता येईल, या आशेने मी उषा चव्हाण यांच्या ’धरपकड’ सिनेमासाठी स्पॉट बॉय म्हणून अर्थात शूटिंगच्या ठिकाणी पडेल ते आणि कुणीही सांगेल ते काम करायला तयार झालो. कलाकारांना नाश्ता-जेवण देण्यापासून त्यांच्या कपड्यांना इस्त्री करण्याचीही कामं मला सांगण्यात येत होती. तिथं अनेक गोष्टींची भागवाभागवी चाललेली असायची. त्यामुळे युनिटमधील सगळ्यांचा नाश्ता-जेवण झाल्यावर माझ्यासाठी जेवायला काही उरायचं नाही. कधी राहिलंच काही तर ते पोटभर नसायचं. तक्रार करून काही मागायची तेव्हा हिंमत नव्हती आणि या क्षेत्रात नवीन, गरजू असल्यामुळे गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.

हे असंच सुरू असताना त्या चित्रपटात अशोक सराफ हिरो असल्यामुळे त्यांना दररोज नाश्ता-जेवण देण्याच्या निमित्ताने जवळून बघायची संधी मिळणं हेच माझ्यासाठी खूप असायचं.

पुण्यातील बोट क्लब रोड वरील खोत बंगल्यामध्ये शुटींग सुरू असल्याने अशोक सराफ यांना बघण्यासाठी बाहेर गर्दी जमलेली असायची. अशोक सराफ यांची एक तरी झलक पाहता यावी म्हणून तरुण पोरं सकाळपासून ताटकळत उभी रहायची. ते पाहून माझा मलाच हेवा वाटायचा की, मी किती नशीबवान आहे. मला अशोक सराफ या नटाला रोज पाहता येतंय. त्यांचा शॉट सुरू झाला की आपल्याला कोण बघणार नाही आणि काम सोडून शुटींग बघायला आलाय का?, असं दरडावून विचारणार नाही ह्याचा अंदाज घेत थोडंसं लपून मी अशोक सराफ यांना अभिनय करताना पाहायचो. त्यांच्या बरोबर निळूभाऊ फुले देखील त्या सीन मध्ये असायचे. त्यांचा शॉट चांगला झाला की सेटवरचे लोक टाळ्या वाजवायचे. त्यात उत्स्फूर्तपणे  वाजणारी एक टाळी माझी असायची.

एके दिवशी अशोक सराफ यांना यायला उशीर होता आणि नाश्ता तर संपून गेला होता. फक्त नावाला थोडीशी मिसळ आणि दोन पाव उरले होते त्यामुळे थोडा राहिलेला  नाश्ता अशोक सराफ यांना द्यायचा कसा? आणि त्यांनी पुन्हा जर पाव मागितले तर काय करायचं? हा प्रश्न मला पडला. बरं उषा चव्हाण आणि  शुटिंगचे  काम सांभाळणाऱ्या त्यांच्या बहिणीनं मला आधी एकदा ताकीद दिली होती की नाश्ता सगळ्यांना कमीच द्यायचा. परत मागितला तरी कुणाला द्यायचा नाही. आहे त्यातच भागवायचे. अशोक सराफ आल्याचे समजताच माझे टेंशन वाढले. मग डोकं चालवून मिसळ मध्ये थोडं पाणी घालून त्याला उकळ्या येऊ दिल्या. मग ती मिसळ पाव अशोक सराफ यांना दिला आणि लगेच तिथून सटकलो. दिवसभर याच टेंशन मध्ये होतो की, मी दिलेली मिसळ खाऊन, नाश्ता चांगला मिळाला नाही अशी तक्रार अशोक सराफ यांनी केली तर आपल्याला इथून हाकलून देतील. हिरोने तक्रार केली तर आपली बाजू कोण ऐकून घेईन. याच तणावाखाली मी होतो. पण तसं काही घडलं नाही. दुपारी लंच ब्रेकला जेवण देण्याची वेळ आली तेव्हा पुन्हा मनात धास्ती की, नाश्ता बरा नव्हता म्हणून आता अशोक सराफ मला ओरडले तर? मी जेवण घेऊन त्यांच्या रुममध्ये गेलो. जेवणाचे ताट ठेवले तेंव्हा ”काय रे तू जेवलास का?" असं मोठ्या आपुलकीनं त्यांनी मला विचारल्यावर मग मात्र माझी भीती गेली आणि तेव्हापासून त्यांच्याशी ‘फॅन’ म्हणून माझं एक भावनिक नातं निर्माण झालं.

पुढे याच चित्रपटात अशोक सराफ यांच्या एका सीनमध्ये त्यांच्या मागे असलेल्या गर्दीत मॉब आर्टिस्ट म्हणून काम करण्यास मला सांगण्यात आले. तेव्हा मात्र खूपच भारी वाटलं. आपण आता अशोक सराफ यांच्याबरोबर सिनेमात दिसणार ह्या आनंदाने मी हवेत तरंगत होतो. जेव्हा हा चित्रपट पुण्यातील विजय टॉकीजला प्रदर्शित झाला, तेव्हा माझ्या बाबांना घेऊन मी गेलो. त्यांना कसलीच आयडिया दिली नव्हती. थिएटरच्या पायऱ्या चढून आत जाताना अशा रुबाबात आणि भ्रमात मी होतो की सिनेमा संपल्यावर याच पायऱ्यांवरून खाली उतरताना लोक मला पाहून विचारतील "तू आत्ता या सिनेमात होतास ना" ?

सिनेमात मी काम केलेला सीन आला. प्रेक्षक त्या सीन मधील हिरो अशोक सराफ यांना बघत होते तर मी त्यांच्या आजूबाजूला, मी कुठं दिसतोय का त्याचा शोध घेत होतो. अचानक ओझरता का होईना पण मी दिसलो. ना माझ्या बाबांची  ना प्रेक्षकांची, कुणाचीही नजर अशोक सराफ सोडून गर्दीतल्या इतर कुणाकडे गेली नाही. आपल्याकडे झालेलं दुर्लक्ष पाहून मी हिरमुसलो. सिनेमा संपल्यावर पुन्हा त्या थियेटरच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना ठरवलं. कधी ना कधी अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळावी यासाठी कष्ट करायचे.

पुढे टीव्ही मालिका, चित्रपट क्षेत्रात निर्माता दिग्दर्शक म्हणून काम करायला लागल्यावर नाव, यश मिळू लागलं. 1992 मध्ये ज्यांना स्पॉट बॉय म्हणून चहा नाश्ता दिला होता त्या अशोक सराफ अर्थात सर्वांचे अशोक मामा यांच्या बरोबर दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मला 2006 मध्ये म्हणजे तब्बल 14 वर्षांच्या परिश्रमानंतर मिळाली. कधी काळी त्यांच्या मागे मॉब आर्टिस्ट म्हणून उभा राहणारा मी त्यांच्या समोर दिग्दर्शक म्हणून उभा राहिलो. मी सांगेन तसे ते ऐकत होते. तेव्हा जुने दिवस आठवून परमेश्वराचे आभार मानले.

या प्रोजेक्ट साठी अशोक मामांनी होकार दिल्यावर मी पैशांबाबत विचारणा केल्यावर अधिकारवाणीने त्यांनी विचारलं ‘‘काय रे खूप पैसे आलेत का तुझ्याकडं". कसलीच अट न घालता त्यांनी माझ्या बरोबर काम केलं. या प्रोजेक्टमध्ये प्रिया बेर्डे, किशोरी अंबीये, अविनाश नारकर ह्याही कलाकारांनी सहकार्य केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने अशोक मामांची भेट होत राहिली. माझ्या संस्थेचा उमेद पुरस्कार त्यांना आशाताई भोसले यांच्या हस्ते दिला, तेव्हा आशा भोसले यांनी 'राम राम गंगाराम' चित्रपटातील अशोक मामांनी केलेली मह्मद्या खाटीकची भूमिका आवडती भूमिका असल्याचे सांगून डायलॉग म्हणायला सांगताच, अशोक मामांनी जोशात ते डायलॉग म्हणत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.

जेव्हा जेव्हा अशोकमामांना भेटायला मी त्यांच्या घरी जातो तेव्हा ‘‘काय मग टिळेकर" असं हसतमुख चेहऱ्याने स्वागत करणारे अशोक मामा मनसोक्त गप्पा मारतात. त्यांच्याकडून निघताना दर वेळी मी माझी काहीना काही वस्तू हमखास विसरतोच. एकदा चष्मा विसरलो, तो घ्यायला मी पुन्हा गेल्यावर इतके मोठे अभिनेते असूनही माझा चष्मा घेऊन ते लिफ्ट जवळ उभे होते. एकदा मोबाईल विसरला तेव्हाही तो घ्यायला मी गेल्यावर लिफ्टच्या तिथं उभ्या असलेल्या अशोक मामांनी माझ्या हातात मोबाईल देत "महेश आता पुढच्या वेळी मात्र स्वतःला विसरू नको इथं" अशी कोपरखळी मारली. मी जोरात हसलो आणि जेव्हा कधी हे परत आठवतो तेव्हा हसून माझा तो दिवस, तो क्षण मस्त आनंदात जातो. जादूगार यालाच तर म्हणतात, जो त्याच्या कलेने आपल्याला हसवतो - आनंद देतो.

उत्कृष्ट अभिनयासाठी महाराष्ट्र शासनाचे 11 स्टेट अवॉर्ड आणि 5 फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित झालेले अशोकमामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Ashok Saraf Birthday: Magician artist of film and theatre industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.