आशाताईंनी गायले रोमाँटिक गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 03:53 PM2019-07-06T15:53:08+5:302019-07-06T16:04:02+5:30

वयाच्या दहाव्या वर्षापासून भारतीय संगीतविश्वात सुरांची उधळण करणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षीही आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली आहे.

Asha bhosle sing romantic song | आशाताईंनी गायले रोमाँटिक गाणं

आशाताईंनी गायले रोमाँटिक गाणं

googlenewsNext

वयाच्या दहाव्या वर्षापासून भारतीय संगीतविश्वात सुरांची उधळण करणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षीही आपल्या आवाजाची जादू कायम ठेवली आहे. शास्त्रीय, सुगम, लोकगीत, कॅब्रे असो वा सुफी, संगीतातील हरएक प्रकार आशाताईंनी आपल्या गायकीने सजवला. क्लब साँग गाण्यात आशाताईंना दुसरा पर्याय नव्हता आणि नाही. त्याकाळी चित्रपटसंगीतात नुरजहाँ, लतादीदी यांच्या सारख्या मातब्बर गायिकांचा बोलबाला असतानाही आशाताईंनी आवाजातील मदहोश नजाकतींनी स्वत:चे स्थान कायम ठेवले आहे. ते आजतागायत अढळ आहे. आशाताईंच्या गायकीतील हीच खासियत असलेली अदा संगीत रसिकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. वयाची शहाऐंशी उलटलेली असतानाही आपल्या चिरतरूण मस्तीभऱ्या अंदाजाने आशाताईंनी ‘व्हॉट्सॲप लव्ह’ ह्या मराठी चित्रपटासाठी एक क्लब साँग गायले आहे.   

अजिता काळे आणि साहील सुल्तानपुरी ह्या गीतकारांची रचना असलेल्या ‘रात सुहानी सी...झाले दिवानी मी’ ह्या नशिल्या आणि मदहोशभऱ्या गाण्याला आशाताईंनी स्वरसाज चढवला आहे. बॉलिवूड मधील अनेक दिग्गज संगीतकारांकडे संगीत संयोजन करणारे नितीन शंकर यांनी ह्या गीताचा बाज ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर केवळ आशाताई आल्या. त्यांनी निर्माता-दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांना ही गोष्ट सांगितली आणि हेमंतकुमार यांनीही लगेच होकार दिला.

आशाताईंना जेव्हा हे गाणं ऐकवलं तेव्हा त्यांची प्रतिक्रीया फारच उत्साही होती. “क्लब साँग आणि तेही मराठीत...अरे वा! खुप वर्षांनी हे गायला मजा येईल. कधी करायचं रेकॉर्डींग?” असे विचारून त्यांनी तिथल्या तिथेच गाण्याची चाल ऐकून गुणगुणायला सुरूवात केली. ह्यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नात तिथे उपस्थित होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आशाताईंचा एक वेगळाच मूड पाहायला मिळाल्याचे आणि त्यापेक्षाही जास्त रेकॉर्डींग स्टुडीयोमध्ये त्यांचा मूड बहरल्याचे त्यांचे निकटवर्तीय आणि संगीतकार नितीन शंकर यांनी सांगितले.

आशाताईंनी गाणे गायले असल्याने त्याचे चित्रीकरणही तशाच ढंगात व्हायला हवे, म्हणून एका आलिशान क्लब मध्ये ह्या गाण्याचे राकेश बापट व नवतारका पल्लवी शेट्टी ह्यांच्यावर चित्रीकरण करण्यात आले आहे. आशाताईंच्या जादुई सुरांचा स्पेशल टच लाभलेलं, विठ्ठल पाटील यांचे नृत्यदिग्दर्शन आणि ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कलात्मक दृष्टीतून साकारलेले हे गाणं पडद्यावर पाहणं एक विलक्षण अनुभव असणार आहे. नानुभाई सिंघानिया ह्यांच्या व्हीडीयो पॅलेस ह्या युट्युब चॅनेलवर हे गाणे आपल्याला पाहता येईल.

प्रेमसंबंधातील हळव्या भावनांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाची कहाणी असलेला एच एम जी एंटरटेनमेंट निर्मित आणि जम्पिंग टोमॅटो प्रस्तुत व्हॉट्सॲप लव्ह हा रोमॅंटीक म्युझिकल चित्रपट येत्या शुक्रवारी 12 जुलै रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Asha bhosle sing romantic song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.