शिंदेसेनेने पाठिंबा मागितल्याचा एमआयएम नेत्यांनी केला दावा, मालेगावात सत्ता स्थापनेच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:52 IST2026-01-20T13:51:19+5:302026-01-20T13:52:07+5:30
Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असतानाच एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमात केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

शिंदेसेनेने पाठिंबा मागितल्याचा एमआयएम नेत्यांनी केला दावा, मालेगावात सत्ता स्थापनेच्या हालचाली
मालेगाव - मालेगाव महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असतानाच एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमात केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेनेने एमआयएमकडे पाठींबा मागितला असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव गेला नसल्याचे शिंदेसेनेकडून सांगण्यात आले.
मालेगाव महापालिकेत 'इस्लाम' आणि समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटचे एकुण ४० नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी त्यांना ४३ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. याचसाठी इस्लाम पार्टीचे सर्वेसर्वा माजी आमदार आसिफ शेख यांनी सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेना आणि एमआयएमला देखील साद घातलेली होती, याशिवाय त्यांनी काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती न करण्याचे देखील स्पष्ट केले होते. त्यामुळे पेच वाढलेला असतानाच एमआयएमच्या दाव्याने ट्रिस्ट आला आहे. मात्र भाजपबरोबर सत्तेत असलेल्या शिंदेसेनेबाबत कोणताही घरोबा करणार नसल्याचे देखील जलील यांनीच स्पष्ट केल्याने एमआयएम आणि शिंदेसेना असे समीकरण जुळण्याची शक्यता धूसर झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून अधिक माहिती देण्याचे टाळण्यात आले.
मनपातील बलाबल
इस्लाम पार्टी - ३५
समाजवादी - ५
एमआयएम - २१
शिंदेसेना - १८
भाजप - २
काँग्रेस - ३
राजकीय पक्षांकडून पत्ते गुलदस्त्यात
मालेगावातील एकुणच राजकीय परिस्थिती पाहाता सत्तेत सहभागी होण्यासाठी सर्वच पक्षांना संधी असल्याने त्यादृष्टीने राजकीय खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. निवहणुकीत एकमेकांच्या विरोधातील पक्ष सत्तेत सहभागी होणार की काठावरील बहुमताचर सत्ता स्थापन केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
युती संदर्भात अद्याप नवीत कोणतीही घडामोड नाही. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच पक्षाकडून योग्य ती भूमिका स्पष्ट केली जाईल. सध्यातरी कोणताही प्रस्ताव कुणालाही दिलेला नाही.
अॅड. संजय दुसाने, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना ग्रामीण
शिंदेसेना असेल सत्तेत?
मालेगावात सत्तेची समीकरण जुळविले जात असतांना शिंदेसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाणार असून शिंदेसेना सत्तेत असेल असा दावा पक्षाच्या एका नेत्याकडून खासगीत केला आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर इस्लाम सोबत कोण जाणार किंवा इस्लाम कुणाला सोबत घेणार यावरचा सस्पेन्स उघडणार आहे.