बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 09:01 PM2024-03-31T21:01:30+5:302024-03-31T21:05:29+5:30

Lok Sabha Election: काही मतदारसंघांबाबत अजूनही शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत खलबते सुरू असून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

Will Sharad Pawar and Jayant Patil cast the dice at the last minute in Beed and Hatkanangle constituencies | बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार?

बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार?

Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीची नुकतीच घोषणा केली. बारामती, शिरूर, वर्धा, दिंडोरी आणि अहमदनगर या पाच जागांसाठी शरद पवारांच्या पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र बीड, सातारा, माढा आणि हातकणंगले या मतदारसंघांबाबत अजूनही शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत खलबते सुरू असून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. बीड लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. मात्र या दोघांबाबतही पक्षात वेगवेगळे मतप्रवाह असून स्वत: शरद पवार हे ज्योती मेटेंच्या उमेदवाराबाबत सकारात्मक असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरल्याचे समजते.

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून यंदा धक्कातंत्राचा अवलंब करत विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापण्यात आले आणि त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं. बीड हा मुंडे कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या जिल्ह्यात राष्ट्रवादीचंही मोठं संघटन आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडेंविरोधात निवडणूक लढवत चांगली मतेही घेतली होती. मात्र आता स्थिती काहीशी बदलली असून राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाची ताकद विभागली गेली आहे. तर दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा ज्या दोन जिल्ह्यांत सर्वाधिक प्रभाव आहे त्यामध्ये बीड आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. अशा स्थितीत मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी दिल्यास अतिरिक्त मते मिळवण्यास मदत होईल, असा विचार शरद पवारांकडून सुरू असल्याची चर्चा आहे. परंतु बजरंग सोनवणे यांनीही नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचं जिल्ह्यात चांगलं संघटन असल्याने सोनवणे यांना पक्षाने पुन्हा संधी द्यावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आग्रही आहेत. याबाबत न्यूज१८ लोकमतने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, ज्योती मेटे यांनी काल रात्री पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी शिक्कामोर्तब होणार की बजरंग सोनवणे यांना पुन्हा संधी दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हातकणंगले मतदारसंघाबाबत जयंत पाटलांच्या डोक्यात काय?

जयंत पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या इस्लामपूरचा बहुतांश भाग हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे हातकणंगलेतून आपला मुलगा प्रतिक पाटील याला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची जयंत पाटलांची इच्छा आहे. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे खासदार आहेत. तर दुसरीकडे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत थेट समाविष्ट होण्यास नकार दिला आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात यावी, यासाठी पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार का, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Web Title: Will Sharad Pawar and Jayant Patil cast the dice at the last minute in Beed and Hatkanangle constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.