ठाकरेंनी मविआसाठी दोनदा प्रयत्न केला, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही; आंबेडकरांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 09:01 IST2024-03-23T08:58:53+5:302024-03-23T09:01:18+5:30
Prakash Ambedkar Vanchit on MVA Seat Sharing: मविआमध्ये राज्यातील ४८ जागांपैकी प्रत्येकाला १२-१२ जागा वाटून घेऊयात, आपण चौघे आहोत, असा प्रस्ताव मी मविआला दिला होता. - प्रकाश आंबेडकर

ठाकरेंनी मविआसाठी दोनदा प्रयत्न केला, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही; आंबेडकरांचा इशारा
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जवळपास सूर जुळणार नाहीत, असेच संकेत येत आहेत. वंचितच्या दाव्यानुसार त्यांना मविआने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता, त्यापैकी दोन जागा त्यांनी फेटाळल्या आहेत. तर मविआने वंचितशिवाय लढण्याची तयारी केली आहे. त्याचा फायदा काँग्रेसला उमेदवार वाढण्यात होणार आहे. असे असताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मविआतील जागावाटपाच्या तिढ्यावर महत्वाचे भाष्य केले आहे. तसेच आम्ही अद्यापही मविआत जाण्यासाठी उत्सुक असल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीमध्ये १० जागांचा तिढा होता. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात हा तिढा होता. त्यापैकी तीन जागांचा वाद सुटल्याची आपल्याला माहिती असल्याचे आंबेडकर म्हणाले. तसेच काँग्रेस आणि ठाकरे सेनेत काही जागांवरून मतभेद असल्याचेही ते म्हणाले. या दोघांनी एकमेकांच्या कोणत्या जागा मागितल्या ते माहिती नाही, असे आंबेडकर म्हणाले. एबीपी माझावर आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे.
याचबरोबर त्यांनी मविआसोबतच्या चर्चा, भेटींमध्ये काय काय घडले हे देखील सांगितले. उद्धव ठाकरेंनी वंचितला दोनदा मविआत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही, असा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला. काही दिवसांपूर्वीच आंबेडकर यांनी काँग्रेसला प्रस्ताव दिला होता. यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडून अपेक्षा राहिली नसल्याचे म्हणत आम्ही तुम्हाला तुम्ही सांगाल त्य़ा सात जागांवर पाठिंबा द्यायला तयार असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले होते.
मविआमध्ये राज्यातील ४८ जागांपैकी प्रत्येकाला १२-१२ जागा वाटून घेऊयात, आपण चौघे आहोत, असा प्रस्ताव मी दिला होता. परंतु आमच्या प्रतिनिधींना बैठकीतून बाहेर बसायला सांगितले गेले. ते तिथेही जाऊन बसले. एकच बैठक घेतली गेली. याला राजकीय बैठक म्हणत नाहीत. कोंबडी सर्वांनी शिजविली, मी यांना एकट्याने खाऊ देणार नाही, अशा इशारा आंबेडकर यांनी मविआ नेत्यांना दिला आहे.