फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 09:03 IST2026-01-08T09:00:51+5:302026-01-08T09:03:07+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray Interview : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त मुलाखत! "मुंबई तोडण्याचे षडयंत्र" आणि "५० खोक्यांचा २००० कोटींचा हिशोब"; वाचा ठाकरे बंधूंच्या मुलाखतीतील सर्वात मोठे १० मुद्दे.

फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरेंनी दिली ससाण्याची उपमा
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या क्षणाची गेल्या दोन दशकांपासून प्रतीक्षा होती, तो क्षण अखेर आला आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत आज पार पडली. मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, "महाराष्ट्र वाचवण्यासाठी" हे दोन भाऊ एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
२० वर्षांनंतर एकत्र येण्याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज संकट मुंबई, महाराष्ट्रावर, राज्यातील शहरांवर आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही. आज महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा विषय आहे. आज नाही तर कधीच नाही ही परिस्थिती मुंबई, ठाण्यावरच नाही तर एमएमआर रिजनवर येऊन ठेपली आहे. आज नाही एकत्र आलो, तर महाराष्ट्र आम्हाला माफ करणार नाही". उद्धव ठाकरे यांनीही दुजोरा देत म्हटले की, "दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा, महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र येणे गरजेचे आहे. महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपण एकमेकांत वेगळ्या चुली मांडल्यातर महाराष्ट्र तोडणारे महाराष्ट्र लुटून जातील ".
संयुक्त महाराष्ट्राच्या वेळची परिस्थिती जाणवत आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला. यावर राज यांनी हो दिसतेय असे सांगितले. बाळासाहेबांनी या विषयावर आंदोलन केले. त्यानंतर शिवसेनेची स्थापना झाली. आज जेवढे लोंढे महाराष्ट्रात येतायत, उत्तरेकडून ५६ एक ट्रेन महाराष्ट्रात भरून येत आहेत. रिकाम्या जात आहेत. आज मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई अशा आठ नऊ महापालिका आहेत. या लोकसंख्येनुसार झालेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात आठ नऊ महापालिका हे प्रमाण जे वाढले आहे, ज्या प्रकारची दादागिरी मुंबईचा महापौर उत्तर भारतीय करणार, असे सांगणे हे किती धक्कादायक आहे. ते लोक मतदारसंघ बनवत आहेत. आपल्याच लोकांकडून हे सर्व करून घ्यायचे. मराठी म्हणून तुम्ही एकत्र येऊ नये. भांडणे, मारामाऱ्या असे केले जात आहे. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा जो खटाटोप सुरु आहे, तेच जुने वातावरण ते निर्माण करत आहेत. केंद्रात ते आहेत, राज्यात आहेत आणि महापालिका यांच्या ताब्यात गेल्यातर नंतर आम्ही काही करू शकत नाही. म्हणून आम्ही आज एकत्र आलो आहोत, असे राज यांनी सांगितले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे जुने षडयंत्र पुन्हा राबवले जात असल्याची भीती दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
राजकारणातली लोक इकडे तिकडे जातात, पण पक्ष संपविणे, त्याचे चिन्ह काढून घेणे पक्ष संपविण्याचे काम हे मराठी माणसाविरुद्धच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर राज यानी अशा लोकांना ससाणे म्हटले आहे. मालकाच्या हातावर बसून ससाणा सावज मारतो. तसेच यांचे सुरु आहे, पक्ष तोडले जात आहेत असे राज ठाकरे म्हणाले. हे मालकाच्या (दिल्लीच्या) हातावर बसून आपल्याच माणसांची शिकार करणारे ससाणे आहेत, असे राज म्हणाले.
४० आमदारांचे २००० कोटी होतात, हे एवढे पैसे कुठून आले- राज ठाकरे
संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर प्रश्न उपस्थित केला. राज ठाकरे यांनी या सर्वांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे. देवेंद्र फडणवीस हे बसविलेले माणूस आहेत. बसलेला माणूस कोणीच नाही. बसवलेला जो असतो तो धन्याचे ऐकतो. फडणवीसांनी भ्रष्टाचाऱ्याच्या गोष्टी करू नयेत. ते अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी भरून पुरावे आणलेले, आता म्हणतायत कोर्टात केस सुरु आहे. तुमच्याकडे आहेत तर द्या ना पुरावे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. पन्नास खोके हा काही गंमतीचा विषय नाही. पन्नास कोटी झाले. ४० आमदारांचे २००० कोटी होतात, हे एवढे पैसे कुठून आले, असाही सवाल राज ठाकरे यांनी केला.