‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:11 IST2024-05-10T14:10:04+5:302024-05-10T14:11:54+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: नकली शिवसेनेवाले बॉम्बस्फोटातील आरोपींना प्रचारात घेऊन फिरत आहेत. ते माझी कबर खोदणार असं म्हणत आहेत. मला जमिनीत गाडण्याचे स्वप्न त्यांना दिसत आहे. लांगुलचालनासाठी ते अशी भाषा बोलत आहेत. यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. या देशातील माता भगिनी माझं रक्षण करतील, याची या मंडळींना कल्पना नाही आहे.

‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर महाराष्ट्रात भाजपाला सोडावी लागलेली सत्ता, त्यानंतर दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेत पडलेली फूट, तसेच शिंदेंच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं महायुतीचं सरकार या सर्व घडामोडींदरम्यान, नरेंद्र मोदींनीउद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर फार काही टीका केली नव्हती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला सातत्याने टीकेचं लक्ष्य करत आहे. आता ठाकरेंच्या सेनेची नकली शिवसेना अशी संभावना करत नरेंद्र मोदी यांनी हे नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याची भाषा बोलत आहेत, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाला टीकेचं लक्ष्य करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, नकली शिवसेनेवाले बॉम्बस्फोटातील आरोपींना प्रचारात घेऊन फिरत आहेत. ते माझी कबर खोदणार असं म्हणत आहेत. मला जमिनीत गाडण्याचे स्वप्न त्यांना दिसत आहे. लांगुलचालनासाठी ते अशी भाषा बोलत आहेत. यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. या देशातील माता भगिनी माझं रक्षण करतील, याची या मंडळींना कल्पना नाही आहे.
नरेंद्र मोदी पुडे म्हणाले की, महाविकास आघाडीतील नेते आरक्षणाच्या महा भक्षणासाठी अभियान चालवत आहेत. तर एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मोदी महायज्ञ करत आहे. मी काँग्रेसच्या शाही परिवाराप्रमाणे मोठ्या घराण्यातून आलेलो नाही. मी गरिबीमध्येच लहानाचा मोठा झालोय. तुम्ही किती कष्ट घेतले आहेत. तुमच्या जीवनात किती अडचणी होत्या, याची मला जाणीव आहे. अनेक आदिवासी कुटुंबांकडे पक्कं घर नव्हतं. तसेच स्वातंत्र्याला ६० वर्षे उलटल्यानंतरही गावात वीज पोहोललेली नव्हती, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
दरम्यान, या सभेतून मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलेल्या ऑफरचीही चर्चा सुरू आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं आहे. काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा आमच्यासोबत या अशी खुली ऑफर मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे. याआधी देखील एका मुलाखतीमध्ये मोदींनी उद्धव ठाकरे अडचणीत असतील तर मदतीसाठी जाणारी पहिली व्यक्ती मी असेन असं म्हटलं होतं. त्यानंतर आता सोबत येण्याची ऑफर दिल्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोदींची जवळीक वाढत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.