मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:46 IST2024-03-29T17:44:07+5:302024-03-29T17:46:36+5:30
loksabha election 2024: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. सांगली, भिवंडी, मुंबईतील जागांवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-शरद पवार यांचा पक्षातील वाद उफाळले आहेत. त्यात आता काँग्रेस मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आल्यानंतर राऊतांनी त्यावरून निशाणा साधला.

मैत्रीपूर्ण लढतीचं जाहीर करू द्या, मग...; काँग्रेसच्या भूमिकेवर ठाकरे गटाचा इशारा
मुंबई - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) काँग्रेस हा समंजस पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढत ही विरोधकांना मदत करण्यासाठी केली जाते अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरून इशारा दिला आहे. महाविकास आघाडीत अद्यापही ४- ५ जागांवर तिढा असून यातील काही जागांवर ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून या जागांवर मैत्रीपूर्ण लढा देऊ अशी भूमिका घेण्यात आली. काँग्रेस नेत्यांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसनं जाहीर करू द्या, मग उत्तर प्रदेश, बिहार आणि संपूर्ण महाराष्ट्रात ४८ जागा आहेत त्यावरही मैत्रीपूर्ण लढती करायच्या का? काँग्रेस हा समजूतदार पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होते हे त्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही विरोधकांना मदत करण्यासाठी केली जाते असं त्यांनी म्हटलं. त्याचसोबत रविवारी आम्ही दिल्लीत जाणार असलो तरी तिथे जागावाटपावर चर्चा होणार नाही असंही राऊतांनी स्पष्ट सांगितले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सांगली, भिवंडी, मुंबई दक्षिण मध्य तसेच इतर २ जागांवर चर्चा झाली. गेल्या अनेक दिवसांपासून मविआच्या बैठकीत या जागांवरून चर्चा सुरू आहे. सांगलीच्या जागेवर ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचसोबत मुंबई दक्षिण मध्य जागेवर अनिल देसाईंना उमेदवारी दिली. त्यावरून काँग्रेसचे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
सांगली, भिवंडीसह ५ जागांवरील दावा काँग्रेस सोडण्यास तयार नाही. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी काँग्रेस करत आहे. त्यामुळे जर अशा मैत्रीपूर्ण लढती झाल्या तर त्यातून महाविकास आघाडीतील मतांचे विभाजन होईल अशी शक्यता ठाकरे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवली. त्यातूनच राऊतांनी काँग्रेसला असा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे.