जर काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं; संजय राऊतांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 11:27 AM2024-03-17T11:27:27+5:302024-03-17T11:28:02+5:30

इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला. जे मोदी-शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं.

If there was no Congress, the country would not have gained independence; Sanjay Raut's target to BJP | जर काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं; संजय राऊतांचा भाजपाला टोला

जर काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं; संजय राऊतांचा भाजपाला टोला

मुंबई - जर या देशात काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असतील हे सगळे काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांसोबत लढा दिला. काही मतभेद असतील परंतु जर काँग्रेस नसती तर नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसते. हा देश बुवा, महाराज, जादूटोणा, तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असता जो आज गेलेला आहे. लाल बहादूर शास्त्री मिळाले, राजीव गांधी, इंदिरा गांधी मिळाल्या. काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते. जे मोदी-शाह यांना बाप जन्मात कधी जमणार नाही. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे करून देशाच्या फाळणीचा बदला घेतला. काँग्रेस नसती तर हे झाले नसते. त्यामुळे भाजपाने काँग्रेसचे ऋण व्यक्त केले पाहिजे. काँग्रेसमुळे आज तुम्ही स्वातंत्र्याची सूर्यकिरणे पाहताय असं त्यांनी सांगितले. 

जागावाटपात कुणाचीही नाराजी नाही

मी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत हजर होतो. मी स्वत: होतो, शरद पवार, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अशोक गहलोत, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे सगळे होते. जागावाटपावर ज्या थोड्या फार अडचणी होत्या त्या मिटवण्यात आल्या असून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू असं सांगत संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या नाराजीवर भाष्य केले. 

प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाने विचार करावा

महाविकास आघाडीत ४८ जागांवर फॉर्म्युला निश्चित केला आहे. आमचा प्रकाश आंबेडकरांशी संवाद सुरू आहे. आंबेडकरांची जी भूमिका आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे हे आम्हालाही मान्य आहे. त्याविरोधात प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा सहभाग झाला. आम्ही त्यांना ४ जागांची ऑफर दिली आहे. त्याबाबत त्यांच्या पक्षात विचार सुरू आहे. आंबेडकरी जनता आणि वंचित जनता ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. जे संविधान बदलू इच्छितात अशा कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रात थारा मिळू नये. या लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत मिळू नये असं जनतेला वाटते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी त्याचा विचार करेल असं संजय राऊतांनी सांगितले. 

Web Title: If there was no Congress, the country would not have gained independence; Sanjay Raut's target to BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.