मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:19 IST2024-04-09T15:18:45+5:302024-04-09T15:19:39+5:30
mahavikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत सांगली, भिवंडीची जागा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झालेत. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भूमिका मांडली.

मीही नाराज, पण झालं ते झालं, हायकमांडचा आदेश पाळावा लागेल; नाना पटोलेंचं मोठं विधान
मुंबई - Nana Patole on Mahavikas Aghadi ( Marathi News ) सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या मेरिटच्या आधारे जागा हव्या होत्या. शेवटपर्यंत आम्ही किल्ला लढवला परंतु हायकमांडच्या आदेशाचं पालन करावं लागतं. ही वेळ एकमेकांविरोधात नाही. भाजपासारख्या हुकुमशाहीला घालवणं ही वेळ आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्ते, नेत्यांना आम्ही समजावून सांगू असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
नाना पटोले म्हणाले की, लोकशाहीपद्धतीने आमचे कार्यकर्ते, नेते बसतील, ते एकत्र बसतील. चर्चा करतील. सांगलीत विश्वजित कदमांनी संघटनेचं काम केले आहे. यावेळी ही जागा कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळेल अशी अपेक्षा होती. पण तोंडचा घास गेल्यासारखं झालं, त्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु हायकमांडनं जो आदेश दिला त्याचे पालन करून आता पुढे गेले पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच भाजपाकडे मुद्दा नाही, त्यामुळे मविआत आग लावण्याचं काम सुरू केलंय. वर्षा गायकवाड या मुंबईच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे आज जे काही वरिष्ठांनी आदेश दिलेत त्याचे पालन करणे आपली जबाबदारी आहे. वर्षा गायकवाड यादेखील बैठकीत होत्या. आता सर्व ठरलंय, त्यामुळे त्यावर चर्चा होणं योग्य नाही. हायकमांडला आम्ही सर्व माहिती दिली. हायकमांडही आमच्या बाजूने होते. पण किती ताणायचं याला मर्यादा असते. महायुतीसारखा आम्हाला तमाशा करायचा नाही असं नाना पटोले यांनी म्हटलं.
दरम्यान, मी स्वत: नाराज आहे. पण प्रमुख म्हणून जे आहे त्याला सामोरे जावून भाजपाला पराभूत करायचं त्यासाठी पुढे जायचं आहे. जागावाटप झालं, आता त्यावर चर्चा नाही. माध्यमांनी जनतेच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष घालावे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, पिण्याचे पाणी लोकांना मिळत नाही. टँकरची वाणवा आहे. राज्यात वाईट परिस्थिती आहे. आता जागावाटपाचा विषय संपला, आता युद्धाच्या मैदानात आहोत, लढायचं आणि जिंकायचं आहे असंही नाना पटोले यांनी सांगितले.