BMC Election Result 2026 : ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच नितेश राणेंनी खिजवलं! व्हिडिओ शेअर करत म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:19 IST2026-01-16T16:17:52+5:302026-01-16T16:19:33+5:30
मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताच आणि ठाकरे गटाची पिछाडी दिसताच नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

BMC Election Result 2026 : ठाकरेंच्या हातातून मुंबई जाताच नितेश राणेंनी खिजवलं! व्हिडिओ शेअर करत म्हणाले..
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांचे चित्र स्पष्ट होताच भाजपचे आक्रमक नेते नितेश राणे यांनी अपेक्षेप्रमाणे जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताच आणि ठाकरे गटाची पिछाडी दिसताच नितेश राणे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.
"उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम!"
नितेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते काहीही न बोलता केवळ कुत्सितपणे खळखळून हसताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी दिलेले कॅप्शन सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी लिहिले आहे की, "उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम!" आदित्य ठाकरे यांचा उल्लेख 'पेंग्विन' असा करत त्यांनी थेट ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील पराभवावर बोट ठेवले आहे.
उद्धवजी आणि पेंग्विन ला
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 16, 2026
जय श्री राम 🚩🚩 pic.twitter.com/HCz2aSp43y
सकाळी ९ वाजताच केला होता दावा
आज सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच, म्हणजे सकाळी ९ वाजताच नितेश राणे यांनी "आम्ही १३० जागा जिंकू" असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. आता सुरुवातीच्या कलानुसार भाजप ९०च्या आसपास आणि महायुती १३०च्या आकड्याकडे सरकत असल्याचे पाहून राणेंनी आपला विजयोत्सव सुरू केला आहे. "मुंबईकरांनी आता उद्धवसेनेला नाकारले असून कमळाचा स्वीकार केला आहे," असा संदेशच त्यांनी या ट्विटमधून दिला आहे.
बालेकिल्ल्याला पडले खिंडार
ठाकरेंच्या हातातून आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका जात असल्याचे पाहून नितेश राणे यांनी या व्हिडिओद्वारे खिल्ली उडवली आहे. या ट्विटमुळे आता उद्धवसेना आणि भाजप यांच्यातील शाब्दिक युद्ध अधिकच पेटण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांचे हे ट्विट केवळ आनंद व्यक्त करण्यासाठी नसून, त्यातून त्यांनी ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर असलेल्या ठाकरेंच्या सत्तेला यंदा भाजपने सुरुंग लावला आहे. राणेंच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असून, भाजप समर्थक या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.