अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार, २२ आमदार शरद पवारांकडे जाणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 13:48 IST2024-03-13T13:47:49+5:302024-03-13T13:48:27+5:30
Rohit Pawar Criticize Ajit Pawar: काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठा महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. यात भाजपाला सर्वात जास्त जागा हव्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटही आपल्या ताब्यात असलेल्या जागा सोडण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कोंडी होत आहे.

अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार, २२ आमदार शरद पवारांकडे जाणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठा महाराष्ट्रातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमध्ये जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. यात भाजपाला सर्वात जास्त जागा हव्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटही आपल्या ताब्यात असलेल्या जागा सोडण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाची कोंडी होत आहे. महायुतीच्या जागावाटपात अजित पवार गटाला एका हाताच्या बोटावर मोजता येथील एवढ्याच जागा मिळतील, असा दावा केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे. अजित पवार गटाचे २२ आमदार माघारी फिरून पुन्हा शरद पवार गटात येतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
याबाबत मोठा दावा करताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार गटामधील २२ आमदारांना परत शरद पवार यांच्याकडे यायचं आहे. तसेच अजितदादांसोबत असलेल्या १२ आमदारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवणं, फायदेशीर ठरेल असं वाटत आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे. शिंदे गटातील अनेक जणांना भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, असा दावाही रोहित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरूनही रोहित पवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत ९ जागा लढायला मिळतील, अशी आशा होती. मात्र त्यांना केवळ ४ जागांवरच समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. आता लोकसभा निवडणुकीला अशी स्थिती असेल तर विधानसभा निवडणुकीत घड्याळ चिन्हावर कुणीच उभं राहणार नाही. सगळे भाजपाकडून कमळ चिन्हावर लढतील. त्यामुळेच अजित पवार गटात काही जण असे आहेत जे अजित पवार यांना भाजपामध्ये जावं, असा सल्ला देत आहेत, असा दावाही रोहित पवार यांनी केला.