राजवर टीका करणारे तावडे पोपटासारखे बोलू लागले - अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 07:27 PM2019-04-08T19:27:12+5:302019-04-08T19:28:28+5:30

राज ठाकरे भाजपाविरोधात भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले’ असा टोला अजित पवारांनी विनोद तावडेंना लगावला.

Ajit Pawar's criticism on Vinod Tawade Statement on Raj | राजवर टीका करणारे तावडे पोपटासारखे बोलू लागले - अजित पवारांचा टोला

राजवर टीका करणारे तावडे पोपटासारखे बोलू लागले - अजित पवारांचा टोला

Next

बारामती - पाच वर्षांपूर्वी राज ठाकरे जेव्हा भाजपाची बाजू घेत भाषण करत होते, त्यावेळी भाजप, शिवसेनेच्या नेत्यांना आतून उकळ्या फुटत होत्या. पण, आता त्यांच्या विरोधात भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले’ असा टोला अजित पवारांनी विनोद तावडेंना लगावला. बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. 

यावेळी अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही आरोप केले. महसूल मंत्री बारामतीत येऊन पाण्याचं नियोजन, चारा छावण्या याबद्दल काहीच बोलत नाहीत. बारामतीच्या जनतेला माझं आवाहन आहे की, ज्या ज्या वेळेस भाजपा-सेनावाले मंत्री खोटी आश्वासनं देऊन मतं मागायला येतील तेव्हा त्यांना पहिले विचारा; तुम्ही तुमच्या तालुक्यात काही काम केलं आहे का? असं आवाहन अजित पवारांनी उपस्थित जनतेला केला. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव निश्चित होणार आहे, यासाठी पवारांचा बारामती दौरा वाढला असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलं. 

तसेच  दुष्काळ, बेरोजगारी, विकासातली अधोगती, कोलमडलेली अर्थव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं सोडून हे सरकार पवार कुटुंबियांवर टीका करत बसलं आहे. मतं खाण्यासाठी भाजपा सरकार साम-दाम-दंड-भेद या साऱ्या नीतीचा अवलंब करत आहे. ही लोकशाही नव्हे तर, हुकूमशाही आहे असा आरोपही अजित पवार यांनी भाजपावर केला. 

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपाला धारेवर धरल्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना टार्गेट करण्यात येत आहे. विनोद तावडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे आघाडीत नसले तरी राज यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे नेते सरसावले असून राज यांच्यावरील आरोपावर राष्ट्रवादी नेत्यांनी उत्तर दिलं आहे. 

Web Title: Ajit Pawar's criticism on Vinod Tawade Statement on Raj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.