Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:03 IST2025-12-30T12:02:14+5:302025-12-30T12:03:10+5:30
मात्र, उमेदवारांची घोषणा नाहीच

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी भाजप ३६, शिंदेसेना ३० आणि राष्ट्रवादी अजित पवार १५ जागा लढवणार असल्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत केली. जागा वाटपाचे आकडे जरी जाहीर केले असले तरी उमेदवारांची घोषणा करणे महायुतीने टाळले असून, ही यादी आज, मंगळवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याआधी जाहीर होणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद झाली.
रविवारी दिवसभर पुलाची शिरोली येथील महादेवराव महाडिक यांच्या पंपावरील बैठकीनंतर जिल्हा बॅंकेतही रात्री बैठक झाली होती. तरीही महायुतीमधील जागांचा तिढा काही सुटला नव्हता. म्हणून पुन्हा महायुतीचे नेते सकाळपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी बसून चर्चा करत होते. अखेर जिल्हा बॅंकेत पाचच्या सुमारास महायुतीचे नेते जमले आणि तेथेच जागांवर एकमत झाले. तेथूनच पत्रकार परिषदेचे निरोप देण्यात आले.
वाचा : हलगीचा कडकडाट, शक्तिप्रदर्शनाने जत्रेचे स्वरुप; १७० अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस
महापालिकेच्या गेल्या सभागृहात भाजप आणि महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडीचे ३३ नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे १५, तर शिवसेनेचे केवळ चार नगरसेवक होते. त्यामुळे भाजपने सुरुवातीपासून ३३ जागांपेक्षा एकही जागा कमी घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती. हे ओळखलेल्या आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या विधानसभेपासून जो ‘इनकमिंग’चा धडाका लावला होता तो अगदी सोमवारी संध्याकाळपर्यंत सुरू होता. त्यामुळे त्यांनी भाजपच्या बरोबरीने जागा मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.
परंतु, तरीही भाजपने त्यांना ३० जागांवरच रोखले. त्यांनीही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यात यश मिळवले. मंत्री मुश्रीफ यांनी २० जागांची मागणी केली होती. परंतु, त्यांना गेल्यावेळच्या नगरसेवकांएवढ्या म्हणजे १५ जागांवरच समाधान मानावे लागले.
एबी फॉर्मचे वाटप सुरू
जरी महायुतीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नसली तरी तीनही पक्षांनी एबी फार्म देण्यास सुरुवात केली आहे. आज, मंगळवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने साहजिकच निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेला समसमान जागा असाव्यात यासाठी शेवटपर्यंत शिंदेसेनेच्या मंत्री, खासदार, आमदारांनी प्रयत्न केले. त्यामुळे तसा फॅार्म्युलाही चर्चेत आला होता. परंतु, २७ डिसेंबरलाच ‘लोकमत’ने भाजपच जागा वाटपात मोठा भाऊ ठरणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर शिक्कामोर्तब झाले.