कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचार तापला; आता उरले दोनच दिवस; उद्या तोफा थंडावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 12:16 PM2024-05-04T12:16:50+5:302024-05-04T12:17:16+5:30

कोल्हापुरात नेत्यांची मांदियाळी, जोडण्या वेगावल्या..

The campaign meetings which have been going on for the past month in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha will be closed tomorrow | कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचार तापला; आता उरले दोनच दिवस; उद्या तोफा थंडावणार

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रचार तापला; आता उरले दोनच दिवस; उद्या तोफा थंडावणार

कोल्हापूर : गेली महिनाभर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा अक्षरश: धुरळा उडाला आहे. प्रचार टिपेला पाेहोचला असून आता फक्त दोन दिवस राहिले आहेत. कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी असून उद्या, रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभांमधील तोफा थंडावणार आहेत.

‘कोल्हापूर’ मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती व महायुतीचे संजय मंडलीक यांच्यात सरळ लढत होत आहे. येथे काही राजकीय पक्षांसह अपक्ष रिंगणात उतरले आहेत. पण, खरी लढत दोघांतच होत आहे. हातकणंगलेमध्ये बहुरंगी लढत होत असली, तरी आघाडीचे सत्यजीत पाटील-सरुडकर, महायुतीचे धैर्यशील माने व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात लक्ष्यवेधी झुंज पाहावयास मिळत आहे.

गेल्या पंधरा-वीस दिवसांत राज्य व देश पातळीवरील अनेक नेते कोल्हापुरात आले होते. प्रचार सभांच्या माध्यमातून विकासाचा अजेंडा सांगत असताना व्यक्तिगत चिखलफेकही केली. व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच अंतर्गत कुरबुरीने उमेदवारांची डोकेदुखी ठरली आहे. विशेषत: महायुतीतील घटक पक्षातील कुरबुरी मिटवण्यासाठी दिग्गज नेत्यांना कोल्हापुरात तळ ठाेकावा लागत आहे.

जाहीर प्रचारासाठी दोनच दिवस राहिल्याने दिग्गजांच्या सभा, पदयात्रा, रॅलीचे आयोजन केले आहे. एकीकडे कोल्हापूरचा पारा ४० डिग्रीपर्यंत पोहोचल्याने वातावरण चांगलेच तापले असताना, राजकीय वातावरणनही शेवटच्या टप्प्यात गरम झाले आहे. उद्या, जाहीर प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या व कोपरा सभांचा नुसता धडाका सुरू आहे. उद्या, सायंकाळी पाचपासून व सोमवारी छुपा प्रचार करता येणार असला, तरी या कालावधीतच यंत्रणा अधिक गतिमान हाेणार आहे.

जोडण्या वेगावल्या..

लोकसभेची निवडणुकीत इतकी ईर्षा कधीच पाहावयास मिळाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गजांच्या सभा झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर तीन दौरे झाले. आघाडी व महायुतीकडून शेवटच्या टप्प्यात जोडण्यांना वेग आला आहे. साम, दाम, दंड सर्व नीतीचा वापर सुरू झाला असून, गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे यंत्रणा सक्रिय झाली आहे.

शेवटचे दोन दिवस तालुका सोडू नका

प्रचाराच्या निमित्ताने इतर तालुक्यात जाणाऱ्या नेत्यांना शेवटचे दोन दिवस तालुका व आपला भाग न सोडण्याच्या सूचना आघाडी व महायुतीकडून देण्यात आल्या आहेत.

Web Title: The campaign meetings which have been going on for the past month in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha will be closed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.