Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत जागावाटपात तिढा कायम, ३६/३०/१५च्या फॉर्म्युल्यावर घमासान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 12:26 IST2025-12-27T12:21:07+5:302025-12-27T12:26:51+5:30
महायुतीची बैठक बारगळली, सहा-सात जागांचा पेच कायम, मंगळवारीच नावे कळणार

Kolhapur Municipal Election 2026: महायुतीत जागावाटपात तिढा कायम, ३६/३०/१५च्या फॉर्म्युल्यावर घमासान
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र यावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक बारगळली. महायुतीच्या उमेदवारांची नावे मंगळवारीच जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीची पुण्यात बैठक, त्यानंतर भाजपची मुंबईत बैठक झाल्यानंतर बऱ्यापैकी जागा वाटप मार्गी लागल्याचे चित्र आहे. परंतु, अजूनही सहा, सात जागांचा पेच कायम आहे. काही ठिकाणी जागा कोणत्या पक्षाला यावर एकमत नाही तर काही ठिकाणी उमेदवारावर एकमत होईना, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक होईल, अशी अटकळ होती. दुपारी १२ च्या सुमारास खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह पदाधिकारी चर्चेसाठी बसले होते. परंतु, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वेळेचे गणित न जमल्याने ही बैठकच झाली नाही.
वाचा: कोल्हापूर महापालिकेत तिसरी आघाडी, वंचित-आप सर्व ८१ जागा लढवणार
बैठक निश्चित झाली की कळवा असे हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या नेत्यांना सांगितले होते. परंतु, बैठकच न ठरल्याने त्यांना निरोप देण्याचा प्रश्नच आला नाही. एकीकडे ही स्थिती असली तरी दिवसभरामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीकडून चर्चा सुरूच ठेवली. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आमदार अमल महाडिक आणि प्रा. जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. तर, शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे शहराध्यक्ष आदिल फरास यांना पाठवून फोनवरूनही चर्चा केली.
राष्ट्रवादीकडून २० जागांची मागणी
राष्ट्रवादीकडून आम्ही २० जागांची मागणी केल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. गेल्यावेळी राष्ट्रवादीचे १४ उमेदवार निवडून आले होते. मुश्रीफ यांची ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता कमी असून काही कमी जागा घेऊन त्यांना तडजोड करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
३६/३०/१५ च्या फॉर्म्युल्यावर घमासान
भाजप ताराराणीचे गेल्या सभागृहात ३३ नगरसेवक होते आणि शिंदेसेनेचे ४ नगरसेवक होते. त्यामुळे सुरुवातीपासून भाजपने जादा जागांची केलेली मागणी अजूनही लावून धरली आहे. त्यामुळेच भाजप ३६, शिंदेसेना ३० आणि राष्ट्रवादी अजित पवार १५ असा फॉर्म्युला पुढे आला असून, यावरच घमासान सुरू आहे. आमदार क्षीरसागर हे जागा कमी घेण्यासाठी तयार नसल्याने या आकड्यांमध्ये थोडाफार फरक पडण्याची शक्यता असली, तरी भाजपच जागा वाटपात मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे.
जनसुराज्यचा विषय, भाजपच्या कोट्यातून
आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडूनही काही जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे जनसुराज्यचा मुद्दा पुढे आला तर तो भाजपच्या कोट्यातून सोडवण्याची जबाबदारी भाजपची राहिल, असेही स्पष्ट करण्यात आले.