Kolhapur: कासारपुतळेतील जवान प्रमोद पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 18:00 IST2025-01-01T17:58:40+5:302025-01-01T18:00:22+5:30
दत्ता लोकरे सरवडे : अपघातात जखमी झालेल्या कासारपुतळे ता. राधानगरी येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांची मृत्यूशी ...

Kolhapur: कासारपुतळेतील जवान प्रमोद पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
दत्ता लोकरे
सरवडे : अपघातात जखमी झालेल्या कासारपुतळे ता. राधानगरी येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. त्यांच्यावर कोल्हापुरातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल, मंगळवारी रात्री (दि.३१ डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. गावासह पंचक्रोशीतील महिला, ग्रामस्थांनी जवान प्रमोद पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. आयटीबीएफच्या जवानांनी प्रत्येकी तीन फायर झाडून त्यांना मानवंदना दिली.
प्रमोद पाटील हा सन २०११ साली इंडो तिबेटियन बाँर्डर पोलिस फोर्स (आयटीबीएफ) मध्ये भरती झाला होता. त्यांने मिझोराम, अरुणाचल प्रदेश सिमेवर सेवा बजावली होती. सध्या तो उतराखंड येथे सेवा बजावत होता. दसरा सण दरम्यान प्रमोद हा एक महिना सुट्टीसाठी गावी आला होता. १३ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर -गारगोटी रोडवर क्रेशरकडे जाणाऱ्या वळणावर अपघात होऊन त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावरती गेले तीन महिने कोल्हापूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली अन् त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आज सकाळी मृतदेह कोल्हापूर येथून मुदाळतिट्टा येथे नंतर बेळगावहून आलेल्या आयटीबीएफच्या वाहनाने मृतदेह गावी आणण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. "प्रमोद पाटील अमर रहे, "भारत माता की जय "अशा घोषणा देण्यात आल्या. आयटीबीएफचे अधिकारी मंगेश यादव व टीम ४४ बीएन यांनी प्रत्येकी तीन फायर करत मानवंदना दिली. पोलीस निरीक्षक डी. एन. देशमुख व सरपंच सुनीता पोवार, विक्रमसिंह आबीटकर, सरपंच रणधिरसिंह मोरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून जवानास श्रद्धांजली वाहिली. पाच वर्षाच्या समर्थने वडिलांच्या मृतदेहास भडाग्नी दिला. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा समर्थ आणि तीन महिन्याची मुलगी चतुर्थी असा परिवार आहे.