‘त्यांच्या’बदली समरजितना मंत्रिपद, पवारांचा शब्द; जयंत पाटील यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 13:37 IST2024-11-19T13:35:25+5:302024-11-19T13:37:04+5:30

कागलमध्ये गद्दार मुश्रीफ यांना पाडण्याचे केले आवाहन

Kagalkars, overthrow Hasan Mushrif, Sharad Pawar's word to give ministership to Samarjit says Jayant Patil | ‘त्यांच्या’बदली समरजितना मंत्रिपद, पवारांचा शब्द; जयंत पाटील यांची ग्वाही 

‘त्यांच्या’बदली समरजितना मंत्रिपद, पवारांचा शब्द; जयंत पाटील यांची ग्वाही 

कागल : ‘कागलकरांनो, गद्दार हसन मुश्रीफ यांना पाडा. मंत्रिपदाची चिंता करू नका, कागलला ‘त्यांच्या’बदली समरजित यांना मंत्रिपद देण्याचा शरद पवार यांनी शब्द दिला आहे, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

येथे समरजित घाटगे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, कागलमध्ये परिवर्तनाचा मोठा अंडरकरंट दिसत आहे. ८४ वर्षांच्या योद्ध्याने मंडलिक यांचा रोष पत्करून मुश्रीफ यांना सर्व काही देऊनही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम मुश्रीफ यांनी केले, म्हणून पवार यांच्याशी गद्दारी केलेल्या मुश्रीफ यांना पाडलेच पाहिजे.

समरजित म्हणाले, विरोधक इतके घाबरले की शेवटची सभा आम्ही गैबी चौकात जाहीर केली होती. तो चौक त्यांनी आधीच बुक केला. मुश्रीफ यांच्याकडून कुठं भंडाऱ्याची शपथ, कुठं लिंबू, मिरची टाक असे भानामतीचे प्रकार सुरू आहेत. त्यापुढे श्रीरामांचे मंदिर असलेल्या खर्डेकर चौकाला ते अशुभ मानतात. याचा कागलकरांनी विचार करावा. जनता दलाच्या स्वाती कोरी म्हणाल्या, ‘तुम्हाला ईडीची नोटीस आली की नाही? तुरुंगवास होणार होता की नाही? पक्ष फोडला की नाही? पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला की नाही? या प्रश्नांची उत्तरं द्या, मग मत मागा.’

यावेळी प्रवीणराजे घाटगे, कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, बाबासाहेब पाटील, नवोदिता घाटगे, नंदितादेवी घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, श्रेयादेवी घाटगे, ॲड. दिग्विजय कुऱ्हाडे, संभाजी भोकरे, सागर कोंडेकर, शिवानंद माळी, अभिषेक शिंपी उपस्थित होते. 

मुश्रीफ गाडले जाणार..

सरोज पाटील म्हणाल्या, जी मंडळी पवार यांना सोडून गेली, तेथील सभा विक्रमी गर्दीत पार पडत आहेत. त्यामुळे कागलमध्येही मुश्रीफ गाडले जाणार हे निश्चित आहे.

Web Title: Kagalkars, overthrow Hasan Mushrif, Sharad Pawar's word to give ministership to Samarjit says Jayant Patil