Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत उद्धवसेनेला १२ जागा; आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:28 IST2025-12-25T14:27:37+5:302025-12-25T14:28:58+5:30
'जागांचा प्रस्ताव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून जो काही निर्णय येईल त्यानुसार आम्ही पुढे जाणार'

Kolhapur Municipal Election 2026: महाविकास आघाडीत उद्धवसेनेला १२ जागा; आप, मनसे, राष्ट्रवादीबाबत सतेज पाटील म्हणाले..
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतीलकाँग्रेस आणि उद्धवसेनेची आघाडी झाली असून उद्धवसेनेला १२ जागा देण्यात येणार आहेत. यातील ७ जागांवर एकमत झाल्याची माहिती काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व उद्धवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाबरोबर बोलणी सुरू असून तेही महाविकास आघाडीत असतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार पाटील म्हणाले, महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादीसह इतर पक्षांनी घेतला होता. उद्धवसेनेबरोबर पाच ते सहा वेळा चर्चा झाल्यानंतर १२ जागांसह स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव आला. यातील १२ जागांचा प्रस्ताव मान्य केला असून यातील ७ जागांवर एकमत झाले आहे. दुधवडकर म्हणाले, १२ जागांपैकी उर्वरित ५ जागांचा प्रस्ताव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून जो काही निर्णय येईल त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. यावेळी आमदार जयंत आसगावकर, उपनेते संजय पवार, विजय देवणे, रवी इंगवले, सचिन चव्हाण, राजू लाटकर, सुनील मोदी, भारती पोवार उपस्थित होते.
वाचा : महायुतीचे आठ, नऊ जागांवर वांदे..; तोडगा काढणार फडणवीस, शिंदे
आपशी मैत्रिपूर्ण लढत
लोकसभेसह विधानसभेलाही इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी एकमेकांना सहकार्य केले आहे. आपने या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली असली तरी त्यांच्याबरोबर आमची मैत्रिपूर्ण लढत राहील असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीबरोबर चर्चेनंतर तिढा सुटेल
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आहे. त्यांचा प्रस्ताव आम्हाला आला असून आमचाही प्रस्ताव त्यांना दिला आहे. चर्चेनंतर त्यांच्याबरोबरचाही जागावाटपाचा तिढा सुटेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
एबी फॉर्म दिल्यानंतरच आघाडीचे चित्र कळेल
काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार या प्रश्नावर आमदार पाटील यांनी ३० डिसेंबरला उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यानंतरच कोण किती जागा, कोणत्या जागा लढवणार हे कळेल असे सांगत फॉर्म्युला सांगण्यास नकार दिला.
मनसेचा प्रस्ताव गुलदस्त्याच
मनसेचा प्रस्ताव आमच्याकडे आलाच नाही असे आमदार पाटील यांनी सांगितले. तर उद्धवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी यांनी मनसेचा प्रस्ताव आमच्याकडे आला होता. मात्र, तो मान्य करण्याजोगा नव्हता असे स्पष्ट केले. तो प्रस्ताव काय होता हे सांगण्यासही मोदी यांनी नकार दिला.