Kolhapur Election 2026: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म; भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये असे किती उमेदवार..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:15 IST2026-01-02T16:14:26+5:302026-01-02T16:15:21+5:30
पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकत्यांना उमेदवारीवेळी मात्र ठेंगा

Kolhapur Election 2026: निष्ठावानांचा अपक्ष अर्ज; 'आयारामां'ना मात्र एबी फॉर्म; भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्ये असे किती उमेदवार..जाणून घ्या
कोल्हापूर महापालिकेसाठी भाजपने जाहीर केलेल्या ३५ जागांपैकी तब्बल ४५ टक्के उमेदवार हे अन्य पक्षांतून आलेले आहेत. शिंदेसेनेतून रिंगणात असलेले ३० पैकी केवळ सातजण मूळ शिंदेसैनिक आहेत, अशीच परिस्थिती इतर पक्षातही असून पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकत्यांना उमेदवारीवेळी मात्र ठेंगा दाखवण्यात आला असून इतर पक्षातून आलेल्या 'आयारामां'नाच सर्वच पक्षांनी प्राधान्य दिले आहे.
भाजपच्या यादीत ४५ टक्के उमेदवार इतर पक्षांतून आलेले
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी सर्वाधिक जागा घेणाऱ्या भाजपने जाहीर केलेल्या ३५ जागांपैकी तब्बल ४५ टक्के उमेदवार हे अन्य पक्षांतून आलेले आहेत. जागांच्या तडजोडीसाठी निवडणूक तंत्र म्हणून भाजपच्या काहींना शिंदेसेनेत पाठवण्यासही भाजप मागे सरलेले नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादीमध्येही भाजपचा एखाददुसरा उमेदवार धाडला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्यांनी जनसुराज्यचा आधार घेतला आहे.
काँग्रेसमधून आलेले दिलीप पोवार, माधुरी व्हटकर, मोहिनी घोटणे, दोन्ही राष्ट्रवादीतून आलेले मुरलीधर जाधव, त्यांच्या सूनबाई सृष्टी, अर्चना उत्तम कोराणे, रेखा उगवे, शिंदेसेनेतून आलेल्या वंदना मोहिते, राजनंदा महाडिक, ताराराणीतून आलेले विलास वास्कर, रिंकू देसाई, रूपाराणी निकम, प्रमोद देसाई, संजय निकम, विशाल किरण शिराळे, पल्लवी नीलेश देसाई, अशा १७ जणांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे मूळ भाजपचे अनेक वर्षे काम करणाऱ्यांना मात्र संधी मिळालेली नाही.
गेल्या एक, दोन वर्षांपासून भाजपचे अनेक मातब्बर कार्यकर्ते महापालिका डोळ्यासमोर ठेवून कार्यरत होते. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, कार्यक्रमात कार्यरत होते; परंतु जसजशी निवडणूक जवळ येईल आणि कोणत्याही परिस्थितीत महायुती होणार हे निश्चित झाल्यानंतर खरा खेळ सुरू झाला. यामध्ये भाजप आणि शिंदेसेनेत जागा अधिक कोणाला याचा संघर्ष सुरू झाला.
वाचा : चर्चेसाठी बोलावलं अन्...; इचलकरंजीत भाजपच्या बंडखोर उमेदवाराबाबत नेमकं काय घडलं..
त्यातून मग तीनही पक्षांनी फक्त जिंकून येईल अशा उमेदवाराला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच भाजप आणि शिंदेसेनेच्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. राष्ट्रवादीकडे दिलेल्या जागांइतके ताकदीचे उमेदवारही नाहीत; परंतु त्यांनीही आपला हट्ट सोडला नाही आणि त्याचाही फटका भाजपच्या काही जागांना बसला.
कुठलाच धरबंद नाही
कोणत्याही परिस्थितीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी या तीनही पक्षांनी मग सगळाच ताळतंत्र सोडला आहे. कसबा बावड्यात एकच चिन्ह ठेवण्यासाठी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना शिंदेसेनेचे चिन्ह घेण्यास सांगितले, तर शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या काहींना भाजपची उमेदवारी देण्यात आली. याच जोडण्या घालण्यात महायुतीचा वेळ गेला आणि यादी जाहीर करण्यास उशीर झाला.
सत्यजित कदम यांच्या चुलत बहिणीला भाजपची उमेदवारी
गेल्या विधानसभेच्या तोंडावर भाजप सोडून शिंदेसेनेत गेलेले सत्यजित कदम यांच्या चुलत बहीण राजनंदा महाडिक यांना भाजपने प्रभाग क्रमांक तीनमधून उमेदवारी दिली. त्याच प्रभागातून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या चुलत मेव्हण्याच्या पत्नी वंदना विश्वजित मोहिते लढत आहेत.
शिंदेसेनेत ३० पैकी ७ उमेदवारच मूळचे शिंदेसेनेचे
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेतून रिंगणात असलेल्या ३० पैकी तब्बल ७९ टक्के उमेदवार बाहेरच्या पक्षातून आयाराम असल्याचे समोर आले आहे. केवळ सातजण मूळ शिंदेसैनिक आहेत. पक्ष निष्ठेपेक्षा निवडून येण्याची क्षमता या निकषाला प्राधान्य दिल्याने बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारीत अधिक संधी मिळाली आहे. परिणामी मूळ इच्छुक शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना रिंगणाबाहेर राहावे लागले आहे.
वाचा : मनपाच्या रिंगणात ४४ माजी नगरसेवकांनी ठोकला शड्डू, कोणत्या प्रभागात बिग फाईट...
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. महायुतीमधील शिंदेसेनेने अधिकृतपणे उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये पहिल्यापासून शिंदेसेनेत असलेल्या अनेकजणांना उमेदवारी मिळाली नाही. शिंदेसेनेचे जिल्हा अध्यक्ष सुजित चव्हाण यांच्या मुलासह उमेदवारीसाठी बंडखोरी करावी लागली. पहिल्यादांच चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक होत असल्याने प्रमुख पक्षांनी पक्षनिष्ठेपेक्षा निवडून येण्यासाठी साम, दाम, दंडासह खर्च करण्याची क्षमता असे निकष लावले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनाही त्याला अपवाद राहिली नाही.
मूळ शिंदेसेनेत असलेले आणि उमेदवारी मिळालेल्या सातपैकी एकजण आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र आहेत. इतर उमेदवारही निवडून येण्याची क्षमता या निकषातूनच निवडण्यात आल्याचे सामान्य निष्ठावंत शिंदे सैनिकांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या तोंडावर इतर आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शिंदेसेनेत आलेल्यांना उमेदवारी देताना प्राधान्य दिले आहे. कॉंग्रेसमधून पक्षप्रवेश केलेले शारंगधर देशमुख, आश्कीन आजरेकर, अशोक जाधव यांच्या पत्नी, प्रकाश नाईकनवरे अजय इंगवले, सत्यजित जाधव, अभिजित खतकर, ओंकार जाधव यांना उमेदवारी मिळाली. अजित पवार राष्ट्रवादीतून आलेल्या अनुराधा खेडकर, शिवतेज खराडे यांना उमेदवारी मिळाली.
मूळ शिंदेसैनिक उमेदवार असे....
कृष्णा लोंढे, अनिल अधिक, नंदकुमार मोरे, मंगल साळोखे, ऋतुराज क्षीरसागर, अजित मोरे, दुर्गेश लिंग्रस.
गोतावळ्यातच उमेदवारी
शिंदेसेनेच्या अनेक उमेदवार हे पक्षाच्या नेत्यांचे पुत्र, पुतणे, जवळचे पाहुणे, पीए, पीएच्या पत्नी अशा गोतावळ्यास उमेदवारी देण्याला भर दिल्याचेही अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीचे १५ पैकी सहाच उमेदवार मूळ पक्षाचे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने १५ उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ६ उमेदवार स्वत:चे असून उर्वरित उमदेवार भाजप, ताराराणी आघाडी, उद्धवसेनेतून आयात केले आहेत. आदिल फरास, हसीना फरास, माधवी गवंडी, जहिदा मुजावर, मानसी लोळगे, महेश सावंत हे पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आहेत.
उमेदवार होते, तिथे जागा सुटल्या नाहीत
राष्ट्रवादी (अजित पवार) कडे २७ माजी नगरसेवकांनी उमेदवारीची मागणी केली होती. महायुतीमध्ये त्यांनी किमान २० जागा मिळाव्यात यासाठी आग्रह धरला होता. पण, प्रत्यक्षात पंधरा जागा मिळाल्या. जिथे पक्षाचे ताकदवान उमेदवार होते, तिथे महायुतीमध्ये जागा सुटल्या नाहीत. जिथे जागा मिळाल्या तिथे ताकदीचे उमेदवार पक्षाकडे नसल्याने त्यांना इतर पक्षातून उमेदवार घ्यावे लागले. गेल्या निवडणुकीत या पक्षाकडे मातब्बर उमेदवार रिंगणात होते.
ऐनवेळी तिघे पक्षात आले, काँग्रेसचे उमेदवार बनले
महापालिका निवडणुकीत ऐनवेळी पक्षांतर करून अनेकांनी दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळवली आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये याचा प्रत्यय आला असून ऐनवेळी काँग्रेसचा हात पकडणाऱ्या तिघा जणांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये काँग्रेसने दत्ताजी टिपुगडे यांना नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून उमेदवारी दिली आहे.
टिपुगडे हे उद्धवसेनेचे पदाधिकारी होते. मात्र, ही जागा काँग्रेसला गेल्याने त्यांनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. तर याच प्रभागात सर्वसाधारण महिला गटातून प्रणोती महेश पाटील यांच्या गळ्यात काँग्रेसने उमेदवारीची माळ घातली आहे. पाटील या उमेदवारी मिळण्याच्या आधी एक दिवस भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. मात्र, महायुतीत उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी काँग्रेसची साथसंगत केली. पक्षानेही एका दिवसात त्यांना उमेदवारी देत बक्षिसी दिली.
चव्हाणांना मिळाली संधी
प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण गटातून महेंद्र चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. चव्हाण हे राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष होते. पण, उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी काँग्रेसचा हात हातात घेत उमेदवारी पटकावली.
सावंत, शेटके, कदम यांना संधी
राष्ट्रवादीचे अनिल कदम यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक १५ मधून त्यांच्या पत्नी अश्विनी कदम यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये भय्या शेटके या कार्यकर्त्यावर काँग्रेसने विश्वास दाखवला आहे. शेटके हे पूर्वाश्रमीचे महाडिक गटाचे कार्यकर्ते होते. प्रभाग क्रमांक ६ मध्ये काँग्रेसने तनिष्का सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तनिष्का या शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे पदाधिकारी धनंजय सावंत यांच्या कन्या आहेत.